फाटलेले आयुष्य शिवण्याचे साहस ठेवा
By admin | Published: December 27, 2014 10:49 PM2014-12-27T22:49:20+5:302014-12-27T22:49:20+5:30
फुलांची मला भीती वाटते कारण काट्यांची आदत झाली ना ! सारे झरे सुखाचे आईत आटलेले. शिवता मलाही आले आयुष्य फाटलेले. जीवनात अनेक संकटे येतात पण संकटावर मात करुन उभे राहायला शिका,
सिंधुताई सपकाळ : संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने ‘आईच्या काळजातून’ चे आयोजन
राजुरा : फुलांची मला भीती वाटते कारण काट्यांची आदत झाली ना ! सारे झरे सुखाचे आईत आटलेले. शिवता मलाही आले आयुष्य फाटलेले. जीवनात अनेक संकटे येतात पण संकटावर मात करुन उभे राहायला शिका, संकटाची उंची आपोआप कमी होईल. फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काटे बोचले तरी सहन करायला शिका, काट्याला फक्त बोचनं माहिती आहे, वेदना कळत नसतात. तुम्ही पायच एवढे घट्ट करा कीस एक दिवस काटेच म्हणतील ‘हम झुकते है तुम चलना शिको’ असे मनोगत समाजसेविका सिंधूताई सपकाळे यांनी येथे व्यक्त केले. संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित ‘आईच्या काळजातून’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सिंधूताई पुढे म्हणाल्या, संसारात पती पत्नीचे महत्त्व सारखेच आहे. संसाराचा गाडा हाकताना आईवर जास्त जबाबदारी असते. त्यामुळेच तिला माऊली म्हणतात. बाप मेला तर मरत नाही. पण आई मेली तर बाप कोळसतो. आणि एक लक्षात ठेवा पित्याचे छत्र हररपलेल्या घरात कोणीही दगड मारतात. त्यामुळे आई मांगल्याचे प्रतिक, तर बाप घराचे अस्तित्व आहे.
नव्या पिढीला संदेश देताना त्या म्हणाल्या, आज जे देशात घडत आहे. त्याला माणूसच नाही तर बाईसुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे मुलींनीसुद्धा आपल्याला चौकट लावायला हवी. दिसणं महत्त्वाचे नाही असणं महत्त्वाच आहे. तुमच्याकडे बघताना दुसऱ्याला मादी वाटायला नको, माय वाटायला हवी! पती पत्नीने एकमेकांना समजून घेणे यालाच बांधिलकी म्हणतात. ती जपलीच पाहिजे. कारण सात टप्यात जपलेली आपली संस्कृती आहे तिला उघडे करुन नका.
मुलांनो शिक्षण घेताना विचार करा, शिक्षण म्हणजे स्वत:ची पातळी सोडणे, हम करे सो कायदा नाही. शिक्षण आस्वादाची चव कळू देते, सोशितांना शिकविते, दुबळ्यांना आधार देते. शिक्षण म्हणजे नम्र होणं. मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील राबराब राबतो कपडे पुस्तके देतो. मोबाईलही देतो त्यांच्याकडे एकदा बघा, शर्ट फाटलेले असतात. चपला तुटलेल्या असतात. मुलं शिकावी म्हणून आई चार घास कमी खाते. उपाशी राहतेस याची जाणीव नव्या पिढीनं ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक लता ठाकरे यांनी केले. मानपत्र वाचन नगरसेविका माया रोगे यांनी केले. संचालन सुधीर झाडे यांनी तर आभार बापुराव मडावी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)