संघटन वाढविण्याचे ध्येय बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:07 AM2018-01-15T00:07:45+5:302018-01-15T00:08:23+5:30
माधवी नाईक : भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठक
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे संघटन कार्य गतीशीलतेने सुरु आहे. महिलांचे राज्यात भक्कम संघटन उभे करण्याकरिता जिल्हा तालुका व ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित ध्येय बाळगून महिलांची संघटन शक्ती मजबुतीने उभी करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक केले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात चंद्रपुरातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष तथा आ. नाना श्यामकुळे प्रदेश महिला आघाडीच्या महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेणुका दुधे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा महामंत्री तथा पं.स. पोंभुर्णाच्या सभापती अल्का आत्राम, मुलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, बल्लारपूरच्या न.प. उपाध्यक्षा मीना चौधरी, प्रदेश कार्यकारीणी सदस्या वंदना आगरकाटे, वैशाली जोशी, झोन सभापती आशा आबोजवार, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, नगरसेविका शिला चव्हाण, गुडधे, अश्विनी आवळे, स्मीता नंदनवार आदी उपस्थिती होती.
अॅड. माधवी नाईक यांनी या बैठकीत महिलांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. आगामी संक्रातीसणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण विषयक योजना सर्वसमावेशक व्हाव्या याकरिता महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करुन वंचित महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीमध्ये अॅड. नाईक यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्यातील अडचणी समजून घेतल्या. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.