त्यांनी साजरा केला कालवडीचा नामकरण सोहळा
By admin | Published: July 7, 2015 01:04 AM2015-07-07T01:04:48+5:302015-07-07T01:04:48+5:30
भूतदया ही संकल्पनाच मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते. प्राणीमात्रांवर दया करा.
घोडपेठ: भूतदया ही संकल्पनाच मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते. प्राणीमात्रांवर दया करा. त्यांना प्रेम द्या हा संदेश देणाऱ्या कितीतरी प्राणीमित्र संघटना आज देशभरात कार्यरत आहेत. मात्र घोडपेठ येथील रामदास कुळमेथे यांनी आपल्या एक महिन्याच्या वासराचा नामकरण सोहळा साजरा करुन भूतदयेचा अभुतपूर्व परिचय दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
रामदास कुळमेथे यांची घोडपेठ येथे तीन एकर शेती आहे. सध्या त्यांच्याकडे दुधाच्या तीन गायी तसेच तीन जर्सी कालवडी आहेत. स्वत:जवळ असलेल्या पशुधनाला ते पोटच्या गोळ्याप्रमाणे वागवतात. त्यांची नित्यनेमाने सेवा करतात. आज माणूसकी हरवत चाललेली आहे. मात्र भूतदया आणि प्रेम कुठेतरी जिवंत असल्याचा परिचय रामदास कुळमेथे यांनी त्यांच्या वागणूकीतून दिला आहे. घोडपेठ येथील पशुधन अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांच्या मार्गदर्शनात जर्सी गायीचे संकरीकरण करण्यात आले. महिनाभरापूर्वी रामदास कुळमेथे यांच्या घरात वासराने जन्म घेतला. त्या वासराचा थाटामाटात नामकरण सोहळा साजरा करुन त्याला गौरी हे नाव देण्यात आले. (वार्ताहर)
जिवंत व्यक्तीचे सर्व सोपस्कार विधीवत पार पाडले जातात. मात्र मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेऊन रामदास कुळमेथे यांनी वासराचा नामकरण सोहळा साजरा करुन प्राणी प्रेमाचा अभूतपूर्व संदेश दिला आहे.
- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुधन अधिकारी, घोडपेठ