समूहाने जंगलात गेल्याने तो वाघाच्या तावडीतून वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:31 AM2021-09-22T04:31:23+5:302021-09-22T04:31:23+5:30
मूल : वाघाने हल्ला केल्यानंतर जनावर असो की मानव प्राणी, जिवंत राहण्याची शक्यता कमी असते. हेच आजवर वाघाच्या हल्ल्याबाबत ...
मूल : वाघाने हल्ला केल्यानंतर जनावर असो की मानव प्राणी, जिवंत राहण्याची शक्यता कमी असते. हेच आजवर वाघाच्या हल्ल्याबाबत दिसून आले आहे. मात्र सोमवारी मूल तालुक्यातील कवळपेठ येथील दिवाकर धीवरू भेंडारे या गुराख्यावर केलेल्या हल्ल्याबाबत घडले आहे. गुरे चारत असताना वाघाने गायीवर हल्ला केल्यानंतर जवळच असलेल्या दिवाकरने वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चवताळलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला केला. खांद्यावर हल्ला केल्यानंतर जवळपासचे तीन ते चार गुराखी जोरजोराने ओरडल्याने वाघ जंगलात पळाला. समूहाने गेल्याने यात गाय व गुराखी जखमी झाले असले तरी त्यांचा जीव वाचला.
मूल तालुक्यात वनविभागाचे बफर व नाॅन बफर असे दोन विभाग असून या दोन्ही क्षेत्रांत वाघाचे अस्तित्व आहे. जांगलव्याप्त परिसर असल्याने वाघ, बिबट व रानटी श्वापदे यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वनविभाग वेळोवेळी लोकांना जंगलात जाण्यापासून रोखते. मात्र जनावरांना चारा घरी देणे शक्य नसल्याने जंगलात गुरे नेल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी जंगलात समूहाने जाण्याचा प्रयत्न दिसायला लागला आहे. चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल उपक्षेत्रातील दहेगाव बिटातील केवळपेठ कक्ष क्रमांक ५१७ मध्ये दिवाकर धिवरू भेंडारे या गुराख्याने आपली जनावरे तीन ते चार गुराख्यांसमवेत नेली. जनावरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्या वेळी जवळच असलेल्या इतर गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलात पळून गेला.