मेडिकल डिग्री विचारताच त्याने लगेच फोन कट केला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:21+5:302021-05-16T04:27:21+5:30
चंद्रपूर : कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे शासकीय अथवा खासगी डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घेऊन अन्य आजार असणाऱ्या रुग्णांवर ...
चंद्रपूर : कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे शासकीय अथवा खासगी डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घेऊन अन्य आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे हा माणुसकीचा मोठेपणा आणि महामारी काळाची गरजच आहे. मात्र, चंद्रपुरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या गडचिरोलीतील एका रुग्णाच्या वाट्याला अत्यंत वेदनादायी अनुभव आला. गुरुवारी त्याने ‘लोकमत’शी संपर्क साधून आपबिती कथन केली.
गडचिरोली येथे शासकीय सेवेत असलेल्या एका युवकाला काही दिवसांपासून चक्कर व मळमळ येत होती. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टरने गडचिरोली, आरमोरी, वडसा, देसाईगंज परिसरात आपल्या हॉस्पिटलचे मोठमोठे फलक लावले आहेत. त्यामुळे या डॉक्टरचे वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या युवकाने चंद्रपुरात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलशी संपर्क साधून डॉक्टर उद्या राहणार काय, याचीही विचारणा केली. डॉक्टरांशी ऑनलाईन समस्या सांगता येईल, असे हॉस्पिटलकडून उत्तर मिळाल्याने दुसऱ्या दिवशी भाड्याचे वाहन करून तो युवक चंद्रपुरातील त्या हॉस्पिटलमध्ये आला. मात्र, डॉक्टरांच्या केबिनबाहेर बसलेल्या एका व्यक्तीने प्रकृतीची दुरूनच विचारणा केली. डॉक्टर कुठे आहेत, असे विचारताच ‘तुमचे जुने रिपोर्ट डॉक्टरांच्या व्हॉटसअॅपला सेंड केले’ असे उत्तर त्याने दिले. डॉक्टरने व्हॉटसअॅप ओपनही केला नसेल तोपर्यंत त्या व्यक्तीने औषधी लिहून दिली. आजार बरा होईल, या आशेने औषधी घेऊन तो युवक वाहनाने गडचिरोलीला परत गेला.
असे फुटले बिंंग...
गडचिरोलीच्या त्या युवकाच्या परिचयाचे मुख्याध्यापक चंद्रपुरातील त्याच हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी उपचारासाठी गेले होते. त्यांनीही जाण्यापूर्वी चौकशी केल्यानंतर डॉक्टर ऑनलाईनवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुुख्याध्यापक त्या हॉस्पिटलमध्ये गेले असता तपासणी करणारा व्यक्ती पक्का ओळखीचा निघाला. दरम्यान ‘तू १०-१२ वी शिकला असताना डॉक्टर कधी झाला’ यासारखे अनेक प्रश्न विचारून त्या मुख्याध्यापकाने चांगलीच खरडपट्टी काढली.
‘हा बोला, मीच डॉक्टर आहे!’
मुख्याध्यापकाने दुसऱ्या दिवशीे हॉस्पिटलमधील हा सारा प्रकार गडचिरोलीच्या त्या युवकाला सांगताच प्रचंड धक्का बसला. उपचाराच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने लगेच हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवर फोन केला. ‘डॉक्टर आहेत काय’ असे विचारल्यानंतर ‘बोला, मीच डॉक्टर आहे’ असे उत्तर हॉस्पिटलमधील त्या व्यक्तीने दिले. त्यानंतर गडचिरोलीच्या युवकाचा पारा भडकला. संतापूनच त्या युवकाने ‘तुमची मेडिकल डिग्री काय’ असा थेट प्रश्न विचारला. मात्र, हॉस्पिटलमधील व्यक्तीने लगेच फोन कट केला. त्यानंतर प्रतिसादच मिळाला नाही. ‘मी सुशिक्षित असूनही चंद्रपुरातील तथाकथित तज्ज्ञ खासगी डॉक्टरकडून असा वेदनादायी अनुभव वाट्याला आला. मग कोरोना काळात अन्य आजार असलेल्या गरिबांचे काय होत असेल,’ असा प्रश्न त्या युवकाने ‘लोकमत’जवळ विचारला आहे.