पाच किमी अंतरावरील वाहनांना टोल मुक्तीसाठी ग्रामस्थ कायम
By admin | Published: January 14, 2015 11:05 PM2015-01-14T23:05:58+5:302015-01-14T23:05:58+5:30
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ असलेल्या टोल परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या ग्रामस्थांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात यावी याकरिता वरोरा येथील शासकीय
वरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ असलेल्या टोल परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या ग्रामस्थांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात यावी याकरिता वरोरा येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत आजही ग्रामस्थ आपल्या मागणीवर कायम होते. या बैठकीत तोडगा निघु शकला नाही. त्यामुळे आमदार धानोरकर यांनी मध्यस्ती करीत गुरूवारी (दि.१५) पुन्हा कंपनी अधिकारी, ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक बोलाविली.
नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याजवळून सर्व्हीस रोड तयार करण्यात आला नाही. नंदोरी, भटाळी आदी गावातील नागरिकांच्या शेती मोठ्या प्रमाणात आहे. शेतात बैलबंडीने टोल नाक्यावरून जाताना जिकरीचे होत आहे. ट्रॅक्टर व लहान चार चाकी वाहनाने शेतात साहित्य घेवून जात असताना शेतकऱ्यांना वारंवार टोल टॅक्स भरावा लागत असल्याने नंदोरी, भटाळी परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहे. त्यामुळे टोलटॅक्स परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या नागरिकांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. आज वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार बाळु धानोरकर यांच्या उपस्थितीत टोल कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. तेव्हा पाच किमी अंतरावरील वाहनांना टोल मुक्तीसाठी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) विभागाकडे टोलविली. यासोबतच टोल नाक्याजवळील सर्व्हीस रोडबाबतही टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस उत्तरे दिले नाही. त्यामुळे बैठकीत ग्रामस्थ आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत टोल मुक्तीवर ठाम राहिले. टोल कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आमदार धानोरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलुन बैठकीचे आयोजन केले आहे. आनंदवन चौकात उड्डानपूल, बोर्डा चौकात सर्व्हीस रोड तथा इतर समस्यांबाबत चर्चा करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)