अजगराच्या तोंडातून पाय सोडवून घेत 'त्याने' वाचवले स्वतःचे प्राण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 07:45 AM2022-11-24T07:45:00+5:302022-11-24T07:45:01+5:30
Chandrapur News चिरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेल्या व्यक्तीला अचानक अजगराने पायापासून गिळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हाताने ताणून पाय बाहेर काढत त्या व्यक्तीने आपले प्राण वाचविले.
विनायक येसेकर
चंद्रपूर : चिरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेल्या व्यक्तीला अचानक अजगराने पायापासून गिळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हाताने ताणून पाय बाहेर काढत त्या व्यक्तीने आपले प्राण वाचविले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. बचावलेल्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
राजू कवडू पचारे (४६) रा. झिंगुजी वॉर्ड भद्रावती असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे. राजू हा नेहमीप्रमाणे बुधवारी ११ वाजता घरून चिरादेवी तलावाकडे गेला व त्यानंतर हवा भरलेल्या ट्यूबच्या साहाय्याने पाण्यात उतरला. पाण्यामध्ये मच्छीमारीसाठी जाळे टाकल्यानंतर तो तलावातील मध्यभागी वेलातील शिंगाडा तोडत असताना अचानक तेथे असलेल्या बारा फूट लांबीच्या अजगराने राजूचा डावा पाय पकडला. त्यामुळे अजगराचे दात हे पायात घुसले. त्यामुळे राजू हा वेदनामय व भयभीत झाला. त्याने आरडाओरड केली. मात्र त्याच्या मदतीला तिथे कोणीच आले नाही. अशा परिस्थितीत त्याने हिमतीने अजगराच्या शेपटीवर उजवा पाय ठेवून नंतर दोन्ही हाताने त्याचा जबडा ताणला. आपला डावा पाय बाहेर काढला. तेव्हा तिथे पाण्यामध्ये रक्ताच्या धारा लागल्या होत्या. तिथेच त्याने त्या अजगराला पाण्यात पाडले व कसाबसा तलावाच्या बाहेर निघाला.
जखमी अवस्थेतच पोहोचला रुग्णालयात
अजगराच्या तावडीतून सुटून तो कसाबसा तलावाबाहेर तर आला. मात्र तिथेही कुणी नव्हते. जखमी अवस्थेत तो मोठ्या हिमतीने आपल्या दुचाकीने भद्रावती गाठून शिंदे हॉस्पिटल येथे स्वत:च उपचारासाठी दाखल झाला. डॉक्टरांनी त्याला त्या अजगराबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केला. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तो उपचार घेत आहे. त्याच्या या हिमतीने सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.