राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे ‘त्यांनी’ घेतली होती शपथ!
By admin | Published: January 20, 2015 11:09 PM2015-01-20T23:09:17+5:302015-01-20T23:09:17+5:30
शुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती.
कुणी केली स्वाक्षरी, कुणी मारले अंगठे!
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
शुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती. ‘आम्ही कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही... दारूबंदीच्या घोषणेशिवाय माघार घेणार नाही...’ शांत वातावरणाला चिरत जाणाऱ्या त्या प्रतिज्ञेतील शक्तीची प्रचिती मंगळवारी तब्बल साडेचार वर्षांनी आली आणि घरोघरी लावलेल्या प्रतिज्ञांच्या तसबिरींनी आज जणू ऐतिहासिक शिलालेखाचा आयाम आला !
चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीचा ध्यास घेतलेल्या श्रमिक एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आता आभाळापेक्षाही विशाल आणि शब्दातही न व्यक्त करता येण्यासारख्या झाल्या आहेत. गेल्या दशकापासून सुरू असलेल्या अथक संघर्षाला आलेले यश या आंदोलनकर्त्याच्या डोळातून वाहणाऱ्या आनंदाश्रूतून प्रगट होत असल्याचे चित्र आज मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसत होते.
दारूबंदी आंदोलनाचा ध्यास घेऊन श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी, डॉ. राणी बंग आदींच्या पुढाकारात आणि हजारो महिलांच्या सहभागातून उदयास आलेल्या आंदोलनाची सार्थकता मंत्रीमंळाच्या निर्णयाने झाली आहे. ग्रामस्वच्छता आणि व्यसनमुक्तीचा सदोदित ध्यास घेतलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आभियानाची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या पुढाकारात निर्धार यात्रा काढण्यात आली होती. यात ७० महिला आणि ३० पुरूष असे १०० जण सहभागी झाले होते. १० आक्टोबर २०१० रोजी या कार्यकर्त्यांनी गुरूकुंज मोझरी येथे जाऊन शपथ घेतली होती. आश्रमाचे तत्कालिन सर्वाधिकारी बबनदादा वानखेडे यांनी प्रकाशदादा वाघ यांच्या उपस्थितीत या सर्वांना शपथ दिली होती. एक हात उंचावून या सर्वांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी शपथ घेतली होती. त्यानंतर प्रत्येकाने समाधीच्या ओट्यावर शपथेचा छापिल कागद ठेवून राष्ट्रसंतांच्या साक्षीने त्यावर स्वाक्षरी केली होती. ज्यांना स्वाक्षरी येत नव्हती त्यांनी अंगठा मारला होता. दारूबंदीच्या निधाराने झपाटलेल्या या प्रार्थनेच्या बळामुळे आणि प्रतिज्ञेच्या शक्तीमुळे लढ्याला यश आल्याची भावना आंदोलकर्त्यांची आहे.