१०० किमी प्रवास करून तो करतोय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:06+5:30
कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आर्थिक उत्पन्न वाढवून देणारा मार्ग दाखविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : एकिकडे सुशिक्षित तरूण बेरोजगारी वाढली म्हणून बोलत आहेत तर दुसरीकडे कृषी क्षेत्रातील नागपूर येथील एका नावाजलेल्या ख्नासगी कंपनीत समाधानकारक पगाराची नोकरी करणाऱ्या युवकाने नागपूरपासून १०० कि.मी. अंतराचा प्रवास करीत ब्रह्मपुरी परिसरात आधुनिक पध्दतीने शेती करून हाताला काम नाही आणि शेती परवडत नाही म्हणून हताश बसलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली आहे.
कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आर्थिक उत्पन्न वाढवून देणारा मार्ग दाखविला आहे.
आकाश प्यारेलाल जांभूळकर असे सदर युवकाचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सालेभाटा या गावातील या युवकाने कृषी पदवीकेचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने खासगी क्षेत्रात नोकरी करणे पसंत केले. अशा परिस्थितीत या युवकाच्या मनात स्वत:चे कृषी शिक्षण व सोबतचं शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती. यातूनच या युवकाने ब्रम्हपुरी-आरमोरी रस्त्यावरील रणमोचन फाट्याजवळ दोन वर्षांपूर्वी किरायाने घेतलेल्या शेतीमध्ये धान, ऊस व ऊसामधे आंतरपीक जसे सांबार, लसण, मूग, सोयाबीन याची लागवड केली.
सेंद्रीय खताचा वापर
या भागातील मुख्य पीक धान असल्यामूळे, या पिकाकरिता आकाशने जमिनीची योग्य तपासणी करुन ७० टक्के सेंद्रीय खत व ३० टक्के रासायनिक खतावर भर दिला. जमिनीचा पोत सुधारण्याकरिता, पिकाची वाढ व गुणवत्ता सुधारण्याकरिता यामधे मुख्यत: कुजलेले सेंद्रीय खत व द्रवरूप टॉनिकचा पऱ्हे भरण्यापसून ते रोवणी व धानाचे लोंब भरेपर्यंत शिस्तबद्ध व काटेकोरपणे वापर केला. अशाप्रकारे एका एकरमध्ये२५ क्विंटल उत्पादन घेतले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माझ्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा व्हावा. यासाठी आपण नेहमीच शेतकºयांना मार्गदर्शन करीत राहणार आहे.
-आकाश जांभूळकर, युवा शेतकरी.