‘त्या’ बेघर झालेल्या विधवा महिलेला घर बांधून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:43+5:302021-02-16T04:29:43+5:30
घुग्घुस : येथील अमराही वार्डातील विधवा महिलेचे घर अन्नधान्य, कापड व जीवनाेपयोगी वस्तूंसह जळून राख झाले. त्यामुळे ती ...
घुग्घुस : येथील अमराही वार्डातील विधवा महिलेचे घर अन्नधान्य, कापड व जीवनाेपयोगी वस्तूंसह जळून राख झाले. त्यामुळे ती विधवा निराधार, बेघर झाली आहे. त्या महिलेला घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले.
१० फेब्रुवारीला सकाळी भागरथा भीमराव शिडाम ही विधवा व वयस्कर महिला मोलमजुरीसाठी शेतात गेली असता तिच्या घराला आग लागली. शेजाऱ्यांनी आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व मोलमजुरी करून जमा असलेली रक्कम, अन्नधान्य, कापडे व जीवनाेपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. त्यामुळे झोपायला घर नाही, खायला काही नाही, अशी त्या विधवा बेघर झालेल्या महिलेची अवस्था झाली. सदर महिलेचे घर राजस्व विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याने तिला शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नसल्याचे घटनास्थळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी सांगितले. सदर बाब सामाजिक कार्यकर्त्या दीपक पेंदोर याने घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांना सांगताच तत्काळ त्या महिलेचे घर गाठले व त्या विधवेची विवंचना पाहून लगेच घर बांधून देण्याबरोबरच जीवनाेपयोगी साहित्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कामगार नेता सैय्यद अन्वर, दीपक पेंदोर, अजय उपाध्ये, बालकिशन कुळसंगे, प्रेम गंगाधरे, सचिन कोंडावार, सहजाद शेख, देव भंडारी, साईल सैय्यद, कुणाल दुर्गे, सुनील पाटील, संपत कोंकटी यांची उपस्थिती होती.