विभागप्रमुखांचा सीईओंच्या पत्राला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:56+5:302021-05-07T04:29:56+5:30
चंद्रपूर : सन २०१९-२०२० मध्ये सर्वसाधारण बदली सत्रात वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय तसेच विनंती बदली करण्यात आली ...
चंद्रपूर : सन २०१९-२०२० मध्ये सर्वसाधारण बदली सत्रात वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय तसेच विनंती बदली करण्यात आली आहे. मात्र, वर्ष लोटले असतानाही काही विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या काही विशेष कर्मचाऱ्यांना भारमुक्तच केले नाही. परिणामी कर्मचारी अडकून असून त्यांच्या सेवाज्येष्ठतेवरही परिणाम पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी १६ एप्रिल रोजी पत्र काढून भारमुक्त करण्यासाठी विभाग प्रमुखांना सक्त आदेश दिले आहे. तरीही अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसून आजही बदली झालेले कर्मचारी आहे, त्याच ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे आता सीईओ या विभागप्रमुखांवर कोणती कारवाई करतात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
१६ एप्रिलला पाठविलेल्या पत्रात सीईओंनी विभागप्रमुख, गटविकास अधिकारी पंचायत समिती, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपअभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांत्रिकी विभाग, उपविभागांना पत्र पाठवून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ भारमुक्त करण्याचे कळविले आहे. दरम्यान, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ऐवजदाराची वाट न पाहता बदली स्थळी रुजू होण्यासाठी तत्काळ भारमुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, एवढे असूनही विभागप्रमुख ऐकण्याच्या मनस्थितीत नसून आपल्या सोईसाठी कर्मचाऱ्यांना अडवून ठेवण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच आता पुन्हा यावर्षीचा बदली हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यादी तयार करताना प्रशासनाला मोठी अडचण निर्माण झाली आहे.
बाॅक्स
शासन निर्णयाच्या उल्लंघनाचा ठपका
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित भारमुक्त करणे अपेक्षित असतानाही अनेकांनी अडवून ठेवत शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचा ठपका सीईओंनी १६ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात ठेवला आहे. असे असताना चंद्रपूर पंचायत समितीसह शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेतील इतरही विभागप्रमुखांनी बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
बाॅक्स
प्रशासनाला अडचण
मागील वर्षी २०२०-२१ मध्ये सर्वसाधारण तसेच विनंती बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात न आल्यामुळे सन २०२१ च्या सत्रामध्ये सर्वसाधारण बदल्या राबविण्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांची एकत्रित वास्तव सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास प्रशासनास अडचण निर्माण झाली आहे. असे असले तरी काही विभागप्रमुख आपल्या सोईसाठी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यास तयारच नसल्याचे समजते. त्यामुळे आता सीईओंनी सक्त होण्याची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
अशी होऊ शकते कारवाई
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या सोईसाठी भारमुक्त न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते.
बाॅक्स
कर्मचाऱ्यांवरच अन्याय
वर्ग ३ मधील एखाद्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आणि काही कारणास्तव तो कर्मचारी संबंधित ठिकाणी दिलेल्या कालावधीत रुजू झाला नाही तर विभागप्रमुख त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतात. मात्र, जेव्हा विभागप्रमुखच कर्मचाऱ्यांची बदली होऊनही त्याला भारमुक्त करीत नसेल तर अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणीही आता काही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.