कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:59+5:302021-05-27T04:29:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन ...

Headaches for farmers to avail the schemes of the Department of Agriculture | कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची डोकेदुखी

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची डोकेदुखी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाईन कामामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी २४ मे हा शेवटचा दिवस होता. अशावेळी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजाला कृषी योजनांपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नी लक्ष घालून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.

शेतीचा खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे व शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात जात आहेत. सध्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आला आहे. रब्बी पिके हातात आली असतानाच वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कंबर कसली आहे. पण शासकीय योजनांसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांपासून ऑनलाईनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कृषी योजनांचा लाभ मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच २४ मे हा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांत मोठा रोष पाहायला मिळत आहे. मुळात ऑनलाईन व्यवस्थेत तांत्रिक घोळ असतानाही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या याच बेजबाबदारपणामुळे शेतकरी कृषी योजनांपासून वंचित राहू शकतो. शासनाने अनुदानावर मिळणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईनची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.

Web Title: Headaches for farmers to avail the schemes of the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.