आॅटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:38 PM2018-11-12T22:38:27+5:302018-11-12T22:38:46+5:30
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. मात्र सदर व्यवस्था सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले आहे.
चंद्रपूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरामध्ये अॅटोरिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यास्थितीत चंद्रपुरात ३६०० च्या जवळपास अॅटोरिक्षा आहेत. त्यातही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. चंद्रपुरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन रस्ते पुन्हा अरुंद केले आहे. तर शहरातील गांधी चौक, जटपूरा गेट, गिरणार चौक, रामनगर चौकातील मार्गावर अनेक बेलगाम आॅटो थांबून असतात. तसेच प्रवासी पाहून अनेक ठिकाणी आॅटोचालक आॅटो थांबवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. मात्र आॅटोचालकांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आॅटोचालक बिनदिक्कतपणे रस्त्यावर आॅटो थांबवत आहेत. याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
अनेक अॅटोचालकांकडे परमिटच नाही
चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस आॅटोरिक्षाची संख्या वाढत आहे. सद्यास्थित शहरामध्ये ३६०० च्या जवळपास आॅटोरिक्षा आहेत. तर अनेक आॅटोरिक्षाचालकांकडे परमिट नसतानासुद्धा सर्रास आॅटो चालवित आहेत. तर अनेकजण एकाच परमिटवर दोन ते तीन आॅटो चालवित आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वाहनतळ वाढविण्याची मागणी
चंद्रपुरातील आॅटोचालकांना ५७ अधिकृत वाहनतळ ठरवूण देण्यात आले आहेत. त्यामध्ये बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन, गिरणार चौक, रामनगर, बांग्ला चौक, सरकारी दवाखाना, गांधी चौक, बंगली कॅम्प यासह अनेक मुख्य चौकांचा समावेश आहे. मात सदर वाहनतळ अपुरे पडत असल्याने १०४ अधिकृत वाहनतळ देण्याची मागणी आॅटोचालकांकडून होत आहे.
प्रवाशांची लूट
आॅटो संघटनेने शहरातील दर निश्चित केले आहे. मात्र अनेक आॅटोचालक या नियमांचे उल्लंघन करुन प्रवाश्यांकडून अतिरिक्त दर आकारत आहेत. अनेकदा नवखा प्रवाशी हेरुन आॅटोचालक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकडत असतात. यावर निर्बंध लादण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.