मुख्याध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:40 PM2018-11-26T22:40:44+5:302018-11-26T22:40:57+5:30
घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व हरहुन्नरी कलावंत दिलीप भोयर (५७) यांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दिलीप भोयर हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व उत्तम वादक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व हरहुन्नरी कलावंत दिलीप भोयर (५७) यांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
दिलीप भोयर हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व उत्तम वादक होते. मागील काही दिवसांपासून ते प्रकृतीमुळे अस्वस्थ होते. घोडपेठ येथे मुख्याध्यापक पदावर नुकतीच त्यांना पदोन्नती मिळाली होती. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांनी वरोरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. वरोरा पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत.
दिलीप भोयर यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सोमवारी स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कवी ना. गो. थुटे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. माजीमंत्री संजय देवतळे, विजय देवतळे, मदन ठेंगणे, डॉ. प्रवीण मुधोळकर व शहरातील मान्यवर उपस्थित होते.