जिल्हा सामान्य रुग्णालयात बसविणार 'हेल्थ एटीएम'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:05 PM2024-10-19T14:05:39+5:302024-10-19T14:07:39+5:30

६० चाचण्यांची सुविधा : रुग्णांचा अहवाल काही सेकंदात मिळणार

'Health ATM' will be installed in the district general hospital! | जिल्हा सामान्य रुग्णालयात बसविणार 'हेल्थ एटीएम'!

'Health ATM' will be installed in the district general hospital!

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसह चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पहिल्यांदाच अत्याधुनिक 'हेल्थ एटीएम' बसवण्यात येणार आहे. या मशीनच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित ६० प्रकारच्या चाचण्या करता येईल. मात्र, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत हेल्थ एटीएम' बसविण्याचा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केला. हे एटीएम आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत परिणामकारक ठरणार असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला. सुरुवातीला ४५ डिजिटल हेल्थ इंटिग्रेटेड किऑस्क म्हणजेच हेल्थ एटीएम मशीन आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये चंद्रपूरचे शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे. यासाठी वैद्यकीय विभागाने २५.४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मशीनमुळे रुग्णाचा अहवाल काही सेकंदात उपलब्ध होणार आहे. त्याचा वापर करणे अत्यंत सोपे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाला आरोग्य एटीएममधून आवश्यक त्या सूचना मिळतील. यात वाय-फाय सुविधाही राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 


असा असेल 'हेल्थ एटीएम' 
रुग्णाला त्याचा मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल टाकल्यास संपूर्ण अहवाल मिळेल. त्यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेटची सुविधा आवश्यक असणार आहे. या एटीएममध्ये सहायक म्हणून पॅरामेडिकल कर्मचारी असतील. चाचणी अहवालाच्या आधारे रुग्णांना थेट संबंधित विभागाच्या डॉक्टरांकडे पाठवले जाईल. प्रत्येक ओपीडीमध्ये आवश्यकतेनुसार रुग्णांची रांग असेल, जेणेकरून डॉक्टरांना जास्तीत जास्त रुग्ण पाहता येतील.


अशा होतील तपासण्या 
ड्राय बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, चयापचय पृष्ठ, शरीरातील चरबी, हायड्रेशन, हृदय गती, उंची, स्नायूंचे प्रमाण, शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, वजन अशा एकूण ६० चाचण्या केल्या जाणार आहेत. शरीर तपासणीसाठी १५ प्रकारच्या चाचण्या तत्काळ उपलब्ध होतील. याद्वारे जलद चाचणी, लघवी चाचणी, गर्भधारणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, मलेरिया, टायफॉइड, एचआयव्ही, ग्लुकोज, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आदी चाचण्या करण्याचीही सुविधा आहे.
 

Web Title: 'Health ATM' will be installed in the district general hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.