आरोग्य केंद्रातच गर्भवती महिला वेदनेने होती विव्हळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:18 AM2019-04-26T00:18:04+5:302019-04-26T00:18:26+5:30

जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत असतात.

In the health center, pregnant woman was suffering from pain | आरोग्य केंद्रातच गर्भवती महिला वेदनेने होती विव्हळत

आरोग्य केंद्रातच गर्भवती महिला वेदनेने होती विव्हळत

Next
ठळक मुद्देडॉक्टर नाही अन् कर्मचारीही नाही : जिवती आरोग्य केंद्र रामभरोसे

संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत असतात. बुधवारी अशीच घटना घडली. दवाखान्यात कुणीच नसल्याने एका गर्भवती महिलेला तासभर वेदनेने विव्हळत ताटकळत रहावे लागले.
बुधवारी सायंकाळी जिवतीवरून ११ किमी अंतरावरील लांबोरी गावातील २४ वर्षीय वंदना तुळशीदास गोरगे ही चार महिन्यांची गर्भवती महिला पोटात वेदना होत असल्याने जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. परंतु तिथे डॉक्टर किंवा अन्य कोणताही कर्मचारी हजर नव्हता. डॉक्टर, आरोग्यसेविका, कंपाऊंडर, चपराशी कोणीही हजर नसल्याने सदर महिला वेदनेने तिथेच तासभर विव्हळत राहिली. काही वेळाने तिथे लोक जमा झाले. त्यांनीही संपर्क साधला. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोन बंद असल्यामुळे बोलणे झाले नाही. त्याच दवाखान्यात कंत्राटी फिरते डॉक्टर असलेले डॉ. कुलभूषण मोरे यांच्याशी संपर्क साधून बोलविण्यात आले. त्यांनी तपासणी करून सदर गर्भवती महिलेला तत्काळ गडचांदूरला रेफर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर सदर महिला गडचांदूर व नंतर चंद्रपूरला रेफर करण्यात आले.
सदर महिला एक तासापासून जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात वेदनेने विव्हळत होती. मात्र या तासाभरात दवाखान्यात कुणीही कर्मचारी फिरकला नाही. या केंद्रात जे मदतनीस पुरुष आहेत ते नेहमी दारूच्या नशेत असतात. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असतानाही येथे वैद्यकीय अधिकारी राहत नाहीत. या ठिकाणी यायलाही अधिकारी घाबरतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
ही पदे आहेत रिक्त
जिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु येथे अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्रच अस्तित्वात आहे. जिवतीसाठी आता ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे बांधकाम सुरू आहे. येथे ४० हजार लोकसंख्येसाठी एकच वैद्यकीय अधिकारी असून यामुळे रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे. येथे एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सेवक, एक आरोग्य सेविका हे पद रिक्त आहे. प्रशासनाने रिक्त पदे भरावी, अशी मागणी होत आहे.

बुधवारी आॅडिट असल्यामुळे मी जिवती बाहेर होतो. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी द्या, ही मागणी शासनाला केली आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी पद भरले तर रुग्णांची गैरसोय होणार नाही.
- डॉ. आर. पी. अनखाडे
वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, जिवती

Web Title: In the health center, pregnant woman was suffering from pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य