आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: November 15, 2016 12:47 AM2016-11-15T00:47:58+5:302016-11-15T00:47:58+5:30
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदे रिक्त असल्यामुळे...
रिक्त पदे भरण्याची मागणी : जिवती तालुक्यातील स्थिती
जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास व इतर शासकीय कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन वर्षांपासून लिपीकाचे पद रिक्त आहे. टेकामांडवा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. पाटण येथे सुद्धा लिपीकाचे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे वणी (खु.) येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. मिनाक्षी मेश्राम यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. मात्र काही दिवसातच त्यांना भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा आरोग्य केंद्राचा भार सोपविण्यात आल्याने ते चंदनखेडा आरोग्य केंद्रातील नागरिकांना सेवा देत आहे. पेसा कायद्यात आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरुन नागरिकांना सेवा देण्याचे नमूद असतानाही ग्रामीण भागात पदे भरली गेली नाही. याबाबत अनेक वेळा संबंधीत विभागाकडे तक्रारी करण्यात आले. मात्र लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नव्याने आलेले वैद्यकीय अधिकारी आजारी तर नाही ना?
जिवती प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळावे म्हणून आरमण उपोषण करण्यात आले होते. या आमरण उपोषणाची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी दिले. मात्र वैद्यकीय अधिकारी स्वत:च आजारी आहे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे कसलेही म्हणने ऐकूण न घेता त्यावर उपचार करणे, आपल्याच मनाने (चिठ्या) औषधी लिहून देणे असे प्रकार घडत आहेत. नियमित दवाखान्यात हजर न राहणे, कधीही सुट्यावर निघून जाणे यामुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या डॉ. चांदेकर यांना उपचार करुन घेण्याची गरज आहे की काय, असा सवालही नागरिक विचारत आहेत.