आरोग्य केंद्र औषधीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:44 PM2018-07-24T22:44:19+5:302018-07-24T22:44:53+5:30
सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.
वातावरणाच्या बदलाने जिल्ह्यातील अनेक भागांत तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सध्या रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, सर्दी, ताप, खोकल्याचा औषधसाठाच केंद्रात नाही. रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकारी बळी पडत आहे. साथरोगाच्या दिवसांतच औषधे नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालआ आहे.
जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ आरोग्य उपकेंद्र, नऊ फिरते पथक, १० आयुर्वेद रुग्णालये आहेत. या रुग्णालयात अनेक औषधे नाहीत. दोन वर्षांपासून औषधे पुरविण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिलेली आहे. ही कंपनी मागणीनुसार औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना करीत आहे. राज्यभरात ही कंपनी औषधांचा पुरवठा करीत आहे. आता औषधांचा पुरवठा करणे या कंपनीला जड जात असल्याचे दिसून येते.
वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, उलट्या अशा आजारांनी नागरिक बेजार आहेत. त्यावरील औषधेही सध्या रूग्णांलयांमध्ये उपलब्ध नाहीत. सर्दी, खोकल्यावरील सिपीकजीन्स व सीकोडॅक्झीन ही साधी औषधेही नाहीत.
तापाच्या रूग्णासाठी पॅरेसिटमेल टॅबलेटही अनेक रुग्णालयांत नाही. शरीरात पाणी टिकवून ठेवण्याचे काम करणारे ओआरएस पावडरही सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना बळी पडावे लागत आहे.
क्षयरोग व उच्चदाब तपासणी बंद
राज्य शासनाच्या माध्यमातून २०१२ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात क्षयरोग, उच्चदाब रुग्णांची नियमितपणे तपासणी सुरू करण्यात आली. तेव्हा आवश्यक ती औषधे देण्यात येत होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही तपासणी बंद आहे. शुगर तपासणीही बंद करण्यात आली असून तपासणी करताना आवश्यक असलेल्या ग्लुकोस्ट्रीप अनेक रुग्णालयांत उपलब्ध नाही. प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांना कॅल्शिअमच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र, त्याही अनेक रूग्णालयात उपलब्ध नाहीत.
औषध पुरवठ्याचे काम मुंबईच्या हॉपकीन कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यात काही आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असेल. मात्र लवकरच ही परिस्थिती सुधारेल व रूग्णांना औषधे मिळतील.
- डॉ. सतीश गोगुलवार
जिल्हा आरोग्य अधिकारी.