तुळशीनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:44+5:302021-08-13T04:31:44+5:30
चंद्रपूर : येथील तुळशीनगरमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत, तसेच परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे यात ...
चंद्रपूर : येथील तुळशीनगरमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत, तसेच परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे यात आणखीच भर पडली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने येथील समस्यांकडे लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य जपावे यासाठी आयुक्तांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच वाॅर्डातील झाडेझुडपे तसेच स्वच्छता करणे अपेक्षित असतानाही येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यातच नाल्या नसल्यामुळे रस्त्यावरून सांडपाणी वाहते. परिणामी, रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालविणेही कठीण झाले आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या आजाराने तोंड वर काढले असून बहुतांश नागरिकांना ताप तसेच अन्य आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे या वाॅर्डातील समस्या सोडवून नाल्या, रस्ते तसेच स्वच्छता करावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिकेला निवेदनाद्वारे केली आहे.