व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळांना आरोग्य विभागाच्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:34+5:302021-09-09T04:34:34+5:30
नितीन मुसळे सास्ती : सध्या सर्वत्र पॅथालॉजी सेंटरकडून होण्याऱ्या लुबाडणुकीवर नागरिकांडून ओरड होत आहे. संबंधित क्षेत्रातील आवश्यक प्रशिक्षण ...
नितीन मुसळे
सास्ती : सध्या सर्वत्र पॅथालॉजी सेंटरकडून होण्याऱ्या लुबाडणुकीवर नागरिकांडून ओरड होत आहे. संबंधित क्षेत्रातील आवश्यक प्रशिक्षण नसतानाही पॅथालॉजी सुरू करून रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे प्रकार दिसून येत असून यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पॅरावैदक परिषद, मुंबईकडून सर्व पॅथालॉजी लॅब, रक्त नमुना संकलन केंद्र आदींची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय अधिक्षक यांना देण्यात आले आहे. यामध्ये राजुरा शहरातील विविध रक्त संकलन केंद्रांना नोटीस देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र पॅरावैदक परिषद अनुसूचीमध्ये समाविष्ट मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नालॉजी पदवी, पदविका व पॅरावैदक परिषदेची नोंदणी नसतानाही अनेकांनी पॅथालॉजी लॅब व रक्त संकलन केंद्र थाटले आहे. तसेच काॅर्पोरेट रक्त संकलन केंद्रांचे तंत्रज्ज्ञ म्हणून घरोघरी जावून रक्तांचे नमुने घेतात व अवास्तव शुल्क आकारून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. बऱ्याच एम. डी. पॅथालॉजी डॉक्टरांकडून अप्रशिक्षित व शासनाकडे नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देऊन बोगसरित्या या व्यवसायाला मुभा देत असल्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेच्या निदर्शनास आल्याने ही तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यात दहा पॅथालॉजी लॅब व रक्त संकलन केंद्रांना वैद्यकीय अधीक्षकांकडून नोटीस बजावून त्यांचाकडून शैक्षणिक अर्हता, पॅथालॉजी नोंदणी प्रमाणपत्र आदींच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. पॅथालॉजी व रक्त संकलन केंद्रांच्या संचालकांची सभा घेऊन त्यांना नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
कोट
जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार राजुरा शहरातील लॅबाेरेटरीला नोटीस देऊन नोंदणीचे कागदपत्र मागविण्यात आले. त्यानुसार लॅबची तपासणी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात आला असून त्यांच्या सूचना प्राप्त होताच पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अनधिकृत लॅबवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, राजुरा.