आरोग्यसेवेला रिक्त पदांचे ग्रहण

By Admin | Published: June 26, 2014 11:08 PM2014-06-26T23:08:32+5:302014-06-26T23:08:32+5:30

आरोग्य सेवेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. औषधसाठी उपलब्ध असल्याची बतावणी करते. मात्र प्रत्यक्षात आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर आरोग्य सेवेला रिक्त पदांचे ग्रहण

Health Service receives vacant positions | आरोग्यसेवेला रिक्त पदांचे ग्रहण

आरोग्यसेवेला रिक्त पदांचे ग्रहण

googlenewsNext

चंद्रपूर: आरोग्य सेवेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. औषधसाठी उपलब्ध असल्याची बतावणी करते. मात्र प्रत्यक्षात आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर आरोग्य सेवेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ‘लोकमत’ने आज गुरुवारी जिल्हाभर जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन करीत धडक दिली. यावेळी रुग्णालयात रुग्णांचे होत असलेले हालच दृष्टीस पडले.
येथील जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या विविध समस्यांसह या परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता रुग्णांचे आरोग्य बिघडविणारी ठरत आहे. गुरूवारी प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारला असता, अनेक वॉर्डात डॉक्टरांचा अभाव दिसून आला. केवळ परिचारिका वॉर्डात रुग्णांवर उपचार करीत होत्या. या रुग्णालयात वर्ग एकची १९ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १३ पदे रिक्त आहेत, तर वर्ग २ ची ३५ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी पाच पदे रिक्त आहेत. औषध साठा मुबलक असला अनेकदा रुग्णांना खासगी दुकानांमधून औषधे विकत आणायला लावली जातात. येथील अपघात विभागात उपचार घेत असलेल्या पोंभुर्णा येथील गजानन भोयर या रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थेबद्दल विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उपचार होत असल्याचे सांगितले. डॉक्टर नियमीत येऊन तपासणी करतात, असेही त्याने स्पष्ट केले. रुग्णांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ केल्या जात नसल्याची माहिती एका जाणकाराने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. रुग्णालयाच्या अवतीभोवती सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
राजुरा - राजुरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी असलेले राजुरा ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. गर्भवती महिलांसाठी असलेले सोनोग्राफी मशीन डॉक्टरअभावी बंद पडले आहे. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट, कोष्टाळा, गोट्टा, विहीरगाव, अन्नुर अंतरगाव, चिचोली, सास्ती, चुनाळा, विरूर स्टेशन या परिसरातील गर्भवती महिलांना हेलपााटे खावे लागत असून राजुरा येथील ग्रामीण रुग्णालय रामभरोसे सुरू आहे.
आज गुरुवारी ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे भेट दिली असता येथील आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद खंडाते यांचे कार्यालय कुलूप बंद होते. विचारणा केली असता डॉक्टर सुट्टीवर असल्याचे समजले. दवाखान्यामध्ये रुग्णासाठी एक नळ आहे. त्या नळाच्या अवतीभोवती घाण साचलेली दिसून आली. थंड पााण्याची मशीन अनेक दिवसांपासून बंद आहे. या रुग्णालयातील रुग्ण सुनिता सेलरकर पेलोरा यांना आज रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी तिला फक्त एक सलाईन लावली आणि काही न तपासता तिला घरी जाण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी निलेश सेलूरकर या रुग्णालयात भरती झाले होते. त्यांना तुम्ही फक्त फुकटचं जेवायला रुग्णालयात भरती होता काय, असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
मूल - जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मूल येथे उभारण्यात आले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून वैद्यकीय इमारत उभारण्यात आली. तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथराव गायकवाड यांनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी या रुग्णालयात सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १० ते १५ वर्षाचा काालावधी लोटत असताना सुद्धा मूल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता पदोपदी जााणवते. आजच्या स्थितीत १ वैद्यकीय अधिक्षक, १ स्त्री रोगतज्ज्ञ व १ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आज दीड महिना पुरेल एवढा औषधसाठा उपल्बध असल्याचे दिसून आले. येथील रुग्णालयात पाण्याची समस्या बिकट आहे. रुग्णांना लांबवरून पाणी आणावे लागते.
चिमूर : ग्रामीण रुग्णालय चिमूरला कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे तथा तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था नाही. रुग्ण कक्षाची केव्हाही साफसफाई होताना दिसत नाही. या रुग्णालयात ४० पदे असून ९७ पदे मंजूर आहेत. यामध्ये ५७ पदे अद्यापही रिक्त आहे.कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णांना बाहेरून एक्स-रे काढून आणाव्या लागतात. रक्ताची तपासणीसुद्धा बाहेरूनच करावी लागत आहे.
गोंडपिपरी- ग्रामीण रुग्णालयात मंजूर असलेले सहा. अधिक्षक पद, एक कनिष्ठ लिपिक, ५ अधिपरिचारिका, २ कक्षसेवक, १ सफाईगार ही पदे मागील बऱ्याच महिन्यापासून रिक्त असल्याची माहिती मिळाली. रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांपैकी येथील एक सहाय्यक डॉक्टर हे सेवेत रुजु राहूनच पुढील शिक्षणासाठी परवानगीनुसार बाहेरगावी असल्याने येथे होमीओपॅथी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीक पद्धतीने उपचार करतानाही बाब निदर्शनास आली. महिला डॉक्टरांचे पद आजही रिक्त आहे.
गडचांदूर-गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात औषधसाठा पुरेसा उपलब्ध नसून काही औषधी बाजुच्या मेडीकलमधून रुग्णांना विकत घ्यावी लागते. औषधींचा पुरवठा मागणीनुसार होत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते.मंगळवारी थुट्रा गावाजवळ अपघात झाला होता. त्यात आमच्या दोघांच्याही पायाला जखम झाली होती. उपचारासाठी दवाखान्यात आले असता. कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही. आज (दि. २६) तब्बल १ तास आम्हाला उपचारासाठी वाट पाहावी लागल्याचे शेषराव पवार व सुरेश चिंचोलकर म्हणाले.
ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात मनुष्यबळ पुरेसा नाही. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व टेकनिशियन सोडल्यास पुन्हा चार स्टाफ नर्स व ३ चपराशी पदाची गरज असल्याचे आढळून आले आहे. येथे औषधी अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. डॉक्टर वेळेवर येत असतात. नर्सची कमतरता आहे. त्यामुळे उपचारात थोडीफार कसर राहते आणि वेळेत सर्व मिळत नाही. तरीही उपचार चांगला होत असल्याचे गरीअंबी पठाण या महिले सांगितले.

Web Title: Health Service receives vacant positions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.