चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी ५ कोटी ६४ लाख रु निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:38 PM2020-03-24T13:38:18+5:302020-03-24T13:38:43+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना अधिक सक्षम व्हावे, नागरिकांना सोईसुविधा तातडीने उपलब्ध होण्याकरिता पालकमंत्री यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पालकमंत्री यांनी स्व अधिकाराचा वापर करत पुनर्नियोजनाद्वारे जिल्हा नियोजन समितीतुन ५ कोटी ६४ लाख रुपये निधी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. या रकमेतून आवश्यक असणारे बेड, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर, आयसोलेशन आणि संबंधित इतर साहित्य लवकरात लवकर खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी विजय वडेट्टीवार सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदरात औषधे, साधनसामुग्री, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ३ कोटी रुपये, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २ कोटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि ओषधे खरेदी करण्यासाठी ६४ लक्ष ७८ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांचे निजंर्तुकीकरण करून संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरिता सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचे पालकमंत्र्यांनी यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, अशी विनंती करत काळजी घ्या सतर्क राहा आणि सहकार्य करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.