तहसीलदारासह आरोग्य पथकाला गावाच्या सीमेवर रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:21+5:30
पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गावात गेले असता येथील गावकऱ्यांनी आम्हाला काहीच झाले नाही, आमची तपासणी करू नका, असे म्हणून या पथकाला गावातून हाकलून लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : आमच्या गावात कोरोना या रोगाच्या लक्षणाची तपासणी करू नका, असा नारा देत संपूर्ण मानोरा गावातील नागरिक लाठयाकाठया घेऊन गावसीमेवर आले. गावात आलेल्या तहसीलदारासह आरोग्य पथकाच्या समोर उभे होऊन त्यांना सीमेवरच रोखले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला.
पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गावात गेले असता येथील गावकऱ्यांनी आम्हाला काहीच झाले नाही, आमची तपासणी करू नका, असे म्हणून या पथकाला गावातून हाकलून लावले.
याबाबतची माहिती तहसीलदार महेश शितोळे व तालुका आरोग्य अधिकारी संजय असूटकर यांना मिळताच ते आरोग्य विभागाच्या पथकासह शनिवारी मानोरा या गावी गेले. त्यांनी नागरिकांमध्ये असणाºया अफवा दूर करण्याचा प्रयत्न करून तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
परंतु त्या ठिकाणी एकाच वेळी संपूर्ण गाव एकत्र जमा होऊन हातात लाठीकाठी घेऊन उभे झाले व गावकऱ्यांनी एक एक करीत आम्हाला काहीच झाले नाही.
आम्हीच आपली काळजी घेऊ, असे म्हणत या आरोग्य पथकाच्या समोर उभे होऊन गावात येण्यात बंदी घातली. वारंवार विनंती करून गावकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसून रोष वाढत असल्याचे पाहून आरोग्य पथक आल्या पावली परत गेले. मात्र या प्रकारामुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. प्रशासनही तणावात होते.
पहिल्यांदा गेलेल्या पथकाला परत पाठविले. त्यामुळे मी स्वत: आरोग्य विभागाच्या टीमसोबत गेलो. परंतु मानोरा येथील गावकरी आमचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.तरीसुद्धा पुन्हा एकदा गावकºयांची समजूत घालून तपासणी शिबिर राबविणार आहोत.
-महेश शितोळे, तहसीलदार, भद्रावती.