आरोग्य कर्मचारी बिनधास्त; पीपीई किटचा वापर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:46+5:302021-05-09T04:28:46+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर जिल्हाभरात निर्माण करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर जिल्हाभरात निर्माण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १८ कोविड केअर सेंटर आहेत. यासोबतच गंभीर रुग्णांसाठी कोविड रुग्णालय स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यासह काही कंत्राटी कर्मचारी तसेच काही खासगी कंपनीचे कर्मचारीही सेवा देत आहेत. डॉक्टर व परिचारिका रुग्णांची तपासणी करून त्यावर उपचार करतात. तर, आरोग्य कर्मचारीसुद्धा रुग्णांची माहिती घेत असतात. यासोबतच स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षकही आपले काम करीत आहेत. पूर्वी पीपीई कीट घातल्याशिवाय कोणतेच कर्मचारी केंद्रामध्ये प्रवेश करीत नव्हते. मात्र, आता या कर्मचाऱ्यांची बेफिकिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कर्मचारी विनापीपीई कीटद्वारेच केवळ मास्क घालूनच केंद्रात प्रवेश करत असून आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धोका संभवण्याची शक्यता आहे.
कोट
काय म्हणतात आरोग्य कर्मचारी
मी पीपीई कीट, मास्क घालूनच कोविड केअर सेंटरमध्ये जात असते. आम्हालासुद्धा आमच्या जीवाची काळजी आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी विनापीपीई कीट कोविड केंद्रामध्ये प्रवेशच देत नाही. त्यामुळे पीपीई कीट घालूनच सेवा बजावत असतो.
आरोग्य कर्मचारी
-----
कोरोनाबाधित रुग्णांशी जेथे संपर्क येण्याची शक्यता असते, तेथे विनापीपीई कीट व मास्कशिवाय प्रवेशच करीत नाही. रुग्णांची माहिती घेताना जातानासुद्धा पीपीई कीट घालूनच जात असतो. इतर कर्मचाऱ्यांचे सांगू शकत नाही.
-आरोग्य कर्मचारी
काय म्हणतात डॉक्टर्स
कोविड केअर सेंटरमधील सर्वांना पीपीई कीट व मास्क घालूनच कोविड केअरमध्ये प्रवेश करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्वजण पीपीई कीट घालूनच रुग्णांवर उपचार करीत असतात. विनापीपीई कीट कुणी आढळून आल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
- डॉक्टर
-----
कोविड केअर सेंटरमध्ये पूर्वीसारखाच पीपीई कीटचा वापर होत आहे. आमची चमू रुग्णांची तपासणी करताना पीपीई कीट व मास्क घालूनच सेवा बजावत असते. विनापीपीई कीट कोविड केअर सेंटरमध्ये जातच नाही.
-डॉक्टर
------
पीपीई कीट तर सोडाच अशा वस्तू घालतात की, साधा डॉक्टर आहे की परिचारिका, हे ओळखायला येत नाही. दुरूनच माहिती विचारून जात असतात. एखाद्या वेळीच स्टेथॅस्कोप लावून तपासणी करीत असतात.
- रुग्ण
-----
एखाद्या वेळेस एखादी कर्मचारी विनापीपीई कीट येत असते. मात्र दोन मास्क, हेल्मेटसारखी टोपी घालून असतात. दिवसातून एक किंवा दोनदाच रुग्णालयात येत असतात. ते पण दुरूनच विचारपूस करतात.
-रुग्ण