नागरकरांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
By admin | Published: November 16, 2014 10:46 PM2014-11-16T22:46:53+5:302014-11-16T22:46:53+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान नेहमीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस पक्षाने काढलेले व्हीप झुगारून यापूर्वी नंदू नागरकर स्थायी समिती
महापालिकेकडे सर्वांचे लक्ष : राजकीय समीकरण मात्र बदललेले
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान नेहमीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस पक्षाने काढलेले व्हीप झुगारून यापूर्वी नंदू नागरकर स्थायी समिती सभापती झाले होते. त्यानंतर नंदू नागरकर हे पक्षात स्थायी होऊन जबाबदारीच्या पदावर कार्यरत झाले. मात्र काही दिवसांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे गटनेते संतोष लहामगे व काही सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारला. आता अशा विचित्र परिस्थितीत संतोष लहामगे यांनीच नंदू नागरकर यांना अपात्र ठरविण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूरला महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापौर पदी काँग्रेसच्या संगिता अमृतकर यांची वर्णी लागली. त्यानंतर जून २०१२ मध्ये स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने रामु तिवारी यांना उमेदवारी दिली होती. या आघाडीत एकूण ३८ नगरसेवक असून गटनेते म्हणून संतोष लहामगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या आघाडीतील नंदू नागरकर यांनीही रामू तिवारी यांना उमेदवारी दिली असतानाही सभापतीपदासाठी आपले नामांकन दाखल केले. गटातील काही नगरसेवकांना हाताशी धरून विरोधकांच्या पाठिंब्यावर सभापती म्हणून निवडूनही आले. रामू तिवारी हे पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांनाच मतदान करण्यात यावे, यासाठी गटनेते संतोष लहामगे यांनी व्हीप जारी केला होता. मात्र या व्हीपला न जुमानता पक्षातीलच नगरसेवक प्रदीप डे, लता साव, संगिता पेटकुले यांनी नंदू नागरकर यांना मतदान केले होते.
या प्रकारामुळे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या सूचनेवरून गटनेते संतोष लहामगे यांनी दोन वर्षांपूर्वी नंदू नागरकर आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांविरुध्द नागपूर विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करून अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.
मात्र नागरकर हे तल्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यावेळी राजकीय दबावामुळे हे प्रकरण आयुक्त कार्यालयात धूळखात पडून होते.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समिकरणच बदलून गेले. संजय देवतळे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे ते भाजपवासी झाले. त्यामुळे चंद्रपुरातील त्यांचे समर्थक नागरकर यांनी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी जुळवून घेणे सुरू केले.
त्यानंतर सुनिता लोढिया यांची महापौर पदावर वर्णी लावण्यासाठी नागरकर यांनी मोर्चेबांधणी केली व पुगलिया गटाच्या नगरसेवकांसोबत हातमिळवणी केली. परंतु मधल्या काळात गटनेते संतोष लहामगे, रामू तिवारी यांचे महापालिकेतीलच एका प्रकरणावरून पुगलिया गटांशी पटेनासे झाले. पुगलिया गटापासून वेगळे होत त्यांनी काही नगरसेवकांना सोबत घेऊन आपली वेगळी चुल मांडली. त्यामुळे पहिल्यांदाच महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालण्यात आले. सुनिता लोढिया काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार असल्याने त्यांना मतदान करण्यात यावे, असा व्हीप खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जारी केला होता. मात्र गटनेते संतोष लहामगे यांचाच आदेश पाळत गटातील नगरसेवक निवडणुकीच्या एक दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राखी कंचर्लावार यांच्या पाठिशी उभे राहिले. परिणामी काँग्रेसच्या सुनिता लोढिया पराभूत झाल्या.
आता नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. महापालिकेत असलेल्या काँग्रेस पक्षाचे सध्या समिकरणच बदलले आहे. अशा विचित्र परिस्थितीत उद्या सोमवारी गटनेते संतोष लहमागे यांनी दोन वर्षांपूर्वी नंदू नागरकर, संगिता पेटकुले, लता साव व प्रदीप डे यांच्याविरुध्द विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)