पुलय्या यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता ७ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:41+5:302021-04-29T04:20:41+5:30
सास्ती : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत पोवनी २ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त तरुणी आशा घटे आत्महत्या प्रकरणातील आरोपी वेकोलीचे नियोजन अधिकारी जी. ...
सास्ती : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत पोवनी २ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त तरुणी आशा घटे आत्महत्या प्रकरणातील आरोपी वेकोलीचे नियोजन अधिकारी जी. पुलय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व अर्जासाठी न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे न्यायालयाच्या कामात अडचण निर्माण होत असून, जवळपास सर्वच सुनावण्यांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता ७ मे रोजी होणार आहे.
आशा तुळशिराम घटे आत्महत्याप्रकरणी पुलय्या यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६ कलमान्वये ४ एप्रिलला गुन्हा दाखल झाला होता. २४ दिवस लोटूनही पुलय्या पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ६ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने रिप्लायसाठी १२ एप्रिल, त्यानंतर १५ एप्रिल, त्यानंतर २० एप्रिल तारीख दिलेली होती. प्रकरणाचे तपास अधिकारी ए.पी.आय. दरेकर यांनी केसपेपर न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने सुनावणीची तारीख २२ एप्रिल दिलेली होती, त्यानंतर आज २८ तारखेला सुनावणी होणार होती. परंतु जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रकोपामुळे न्यायालयाच्या कामात अडचणी निर्माण होत असल्याने आजही कामकाज होऊ शकले नाही व पुढील तारीख देण्यात आली. आता येत्या ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.