४०१ बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:44 AM2019-05-29T00:44:37+5:302019-05-29T00:45:06+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी पिढी निरोगी तसेच सुदृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी पिढी निरोगी तसेच सुदृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३-१४ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण २४ पथक मंजुर करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत अंगणवाडी, तसेच शाळांतील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत बालकांची ४ डीएससाठी तपासणी, निदान आणि उपचार करण्यात आला.
अभियानांतर्गत शाळा, अंगणवाडीची तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजारी बालकांवर शाळा तसेच अंगणवाडीमध्येच औषधोपचार करण्यात आला. ज्याचे उपचार अंगणवाडी, शाळांमध्ये होऊ शकत नाही. अशा बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.
हृदयरोग आजार जन्मता व्यंग या प्रकारात मोडत असून या आजारावर वेळेत उपचार न केल्यास बालक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हृदयरोग आजार असणाऱ्या बालकांना हा आजार असल्याचे निश्चित करण्याकरिता २ डी इको चाचणी करणे गरजेचे असते. या कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०१९ मध्ये एसआरसीसी हॉस्पिटल, नारायणा हेल्थ केअर मुंबई यांच्या मार्फत १८१ बालकांवर, एप्रिल २०१९ मध्ये बालाजी हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्फत ८६ बालकांचे मोफत २ डी इको करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात १ ते १८ वयोगटातील बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसून या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास २ ते ४ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. हृदयरोग आजारावर शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे पालक आपल्या पाल्याची हृदयरोग शस्त्रक्रिया करून घेण्यास असमर्थ ठरतात.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयरोग आजारावर शस्त्रक्रीया करून घेण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक व जिल्हास्तरीय समन्वयकांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ४०१ बालकांची यशस्वी हृदयरोग शस्त्रकिया करून घेण्यात आली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा खनिकर्म निधी, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली असून आचार्य विनोभा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, अच्चुत महाराज हार्ट हॉस्पीटल अमरावती, श्रीकृष्ण हृदयालय नागपूर, फोर्टीस हॉस्पीटल मुंबई, एसआरसिसी हॉस्पीटल मुंबई, बालाजी हॉस्पीटल मुंबई आदी रुग्णालयांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
या योजनेंतर्गत बालकांना येण्या-जाण्याची व्यवस्था करून देण्यात येत असून रुग्णालयामार्फत जेवणाचीही व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पालकमंत्र्यांचे मानले आभार
२०१७-१८ मध्ये राष्ट्रीय स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमधून निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमासाठी २० बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शस्त्रक्रिया झालेल्या बालकांच्या पालकांनी आभार मानले. यासोबतच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकार अधिकारी यांनीही सहकार्य केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटांतील बालकांवर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात येते. ज्या बालकांना आजार आहे, अशा बालकांच्या पालकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क करून सदर सेवेचा लाभ घ्यावा.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक
सामान्य रुग्णालय, चंद्रपूर