हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह
By परिमल डोहणे | Published: October 2, 2023 06:56 PM2023-10-02T18:56:04+5:302023-10-02T18:56:38+5:30
रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले.
चंद्रपूर : गणपती विसर्जनादरम्यान असोलामेंढा तलावाच्या कालव्यात तिघेजण बुडाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावली येथे घडली होती. निकेश हरिभाऊ गुंडावार (३१) रा. चांदली (बुज), गुरुदास दिवाकर मोहुर्ले (३३) रा. सावली या दोघांचा मृतदेह रविवारी आढळून आला होता. तर संदीप हरिभाऊ गुंडावार (२७) रा. चांदली (बुज) याचा मृतदेह सोमवारी सकाळी भोवर्लाजवळ आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी चांदली (बुज) त्याच्या मूळ गावी येथे एकाच चितेवर संदीप व निकेश या दोन्ही भावांना मोठ्या भावाने भडाग्नी दिला. हे हृदयद्रावक दृश्य बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
सावली येथील गणपती विसर्जन शनिवारी होते. रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले. सावली पोलिसांनी शोधमोहीम राबविली. शनिवारी रात्रीच गुरुदास मोहुर्ले याचा मृतदेहच हाती लागला. त्यानंतर, रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दुपारी निकेश गुंडावार याचा मृतदेह आढळला. परंतु, संदीपचा शोध लागला नव्हता. पोलिसांची शोधमोहीम सुरूच होती. २४ तासांच्या प्रयत्नानंतर सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. संदीप व निकेश या दोन्ही भावंडांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर गुरुदासच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजतादरम्यान चारगाव नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी आपल्या दौऱ्यात बदल करून या दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करून मदतीचा हात दिला.
बॉक्स
चार महिन्यांपूर्वीच झाला होता संदीपचा विवाह
चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू काही महिन्यांपूर्वी सावली शहरात आले. त्यांनी येथे रसवंतीचा व्यवसाय थाटला. व्यवसायात चांगलाच जम बसला होता. मागील चार महिन्यांपूर्वी संदीपचा विवाह झाला होता. आता संदीप व निकेश या दोघांवरही काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. संदीपच्या मागे वडील, एक भाऊ, पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
बॉक्स
२४ तास पोलिसांची शोधमोहीम
तीनजण बुडाल्यानंतर सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात सावली पोलिसांची चमू व आपदा पथक यांनी शोधमोहीम सुरू केली. रविवारीपर्यंत दोघांचा मृतदेह हाती लागला होता. परंतु, संदीपचा मृतदेह आढळून आला नव्हता. पोलिसांनी रात्रीसुद्धा शोधमोहीम सुरूच ठेवली होती. सोमवारी सकाळी संदीपचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.