समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला
By admin | Published: July 10, 2016 12:39 AM2016-07-10T00:39:51+5:302016-07-10T00:39:51+5:30
पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.
बोडी-तलावात पाणी साठले : पेरण्यांच्या कामांना अचानक वेग
मूल: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.
आजच्या स्थितीत धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. तसेच धानाच्या पिकाला जोड म्हणून पर्यायी पिकालासुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दर्शवित कापूस, तुर, सोयाबीन, भाजीपाला याचादेखील पेरा पूर्ण केल्याचे दिसून येते. यावर्षी १६० हेक्टरवर आवत्याची पेरणी झाली आहे, हे विशेष!
मूल तालुक्यात दोन नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. यावर्षी भरपूर पाऊस येणार ही हवामान खात्याची भविष्यवानी खोटी ठरणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी सतावत होता. मात्र प्रथमत: ३ जूनला ३६.८ मिमी पाऊस पडून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कमी-अधीक प्रमाणात पाऊस पडल्याने आजच्या स्थितीत ४५७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांनी चिखल पऱ्हे टाकण्यास पसंती दर्शविली तर काहींनी आवत्या धानाच्या पेऱ्याला पसंती दिल्याचे दिसते. तालुक्यातील पिकाखाली क्षेत्र २४ हजार हेक्टर असून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ७६० हेक्टर आहे. आजच्या स्थितीत ९ हजार ४५० हेक्टरसाठी धानाचे पऱ्हे १०५० हेक्टर पेरण्यात आले. एकंदरीत ९० टक्के धानाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तूर २१० हेक्टर, सोयाबीन ७९९ हेक्टर, कापूस १७० हेक्टर, भाजीपाला १५ हेक्टर, लागवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत जलशिवार योजनेअंतर्गत मृद संधारण कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मूल तालुक्यात मागील वर्षी १११ गावांपैकी मोजक्या गावातच धानाचे पिक झाले. उर्वरित गावामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. मात्र दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिकविम्याची रक्कमदेखील देण्यास शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत दोन वर्षे मूल तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित होत असल्याने शेतकऱ्यात असंतोष दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)