तप्त उन्हात वीज वाहिनी केली दुरूस्त
By admin | Published: May 30, 2016 01:11 AM2016-05-30T01:11:06+5:302016-05-30T01:11:06+5:30
६६ केव्हीची वीज वाहिनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुटली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. यामुळे वरोरा तालुक्यातील ग्रामीण भाग कित्येक तास अंधारात राहील, अशी शंका होती.
पाच तास परिश्रम : वरोरा उपविभागातील गावे राहणार होती अंधारात
वरोरा : ६६ केव्हीची वीज वाहिनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुटली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. यामुळे वरोरा तालुक्यातील ग्रामीण भाग कित्येक तास अंधारात राहील, अशी शंका होती. मात्र उष्ण तापमानात वरोरा वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करून चार तासात वीज वाहिनी दुरूस्त केली आणि वीज पुरवठा सुरू झाला.
वरोरा-नंदोरी या ६६ केव्ही वीज वाहिनीचे तार अचानक तुटले. याच वीज वाहिनीवर ३३ केव्ही खांबाडा, ३३ केव्ही टेमुर्डा या उपकेंद्रांना वीज पुरवठा करण्यात येतो. ६६ केव्ही वीज वाहिनी ठप्प झाल्यास त्यावर विसंबुन असणाऱ्या ३३ केव्ही व ११ केव्ही वीज वाहिन्या ठप्प होत असतात. त्यामुळे वरोरा उपविभागातील अनेक गावे विद्युत पुरवठ्याअभावी प्रभावित होणार असे मानले जात होते.
सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने तापमानात तुटलेल्या वीज वाहिनीला सुरळीत कसे करणार, अशी शंका व्यक्त होत होती. परंतु वरोरा वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळावर धाव घेतली.
त्यांच्यासोबत वाघदरे, कनिष्ठ अभियंता रावत, शुभम मस्के, शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता तुटलेली ६६ केव्ही वीज वाहिनाी अथक परिश्रम करून अवघ्या पाच तासात दुरुस्त करून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (तालुका प्रतिनिधी)