भारीप बहुजन महासंघातर्फे धरणे
By admin | Published: July 3, 2016 12:59 AM2016-07-03T00:59:36+5:302016-07-03T00:59:36+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास ५०० भाडोत्री गुंडांकडून तोडण्यात आले.
चंद्रपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास ५०० भाडोत्री गुंडांकडून तोडण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या जागेवरुन बुद्धभूषण प्रिटींग प्रेस काढून प्रबुद्ध भारत, मुकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वर्तमानपत्रे चालवून समाजात जागृती केली. त्या प्रेसला उद्ध्ववस्त करण्यात आले. भारिप बहुजन महासंघाने धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.
बुद्धभूषण प्रिटींग प्रेसची जागा पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टकडे असताना त्या ट्रस्टवर रत्नाकर गायकवाड हे अवैधरित्या ट्रस्टी बनून कुठल्याही आदेशाविना आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस भाडोत्री गुंडाकडून तोडले. आंबेडकर भवनाची जागा ही खासगी बिल्डरच्या घशात घालून त्या जागेवर प्रस्तावित १८ मजली व्यावसायिक संकुल बांधण्याचा प्रयत्न रत्नाकर गायकवाड यांच्या माध्यमातून चाललेला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका यांचा किंवा इतर कोणाचाही शासकीय आदेश नसताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात आली आहे. रत्नाकर गायकवाड व इतर आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी धरणे देण्यात आले. यावेळी कुशल मेश्राम, सुरेश नारनवरे, सेवकचंद्र नागदेवते, तथागत पेटकर, पी.व्ही. मेश्राम उपस्थित होते.