चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; पुरात दोघे वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 07:11 PM2018-07-06T19:11:45+5:302018-07-06T19:14:29+5:30
मागील २० तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले असून दोघे पुरात वाहून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील २० तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले असून दोघे पुरात वाहून गेले. यासोबत राजुरा तालुक्यात २५ घरांची पडझड झाली. वरोरा तालुक्यात पुरात अडकलेल्या ११ पैकी दहा जणांना वाचविण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात गुुुुरुवारी ८ वाजतापासून संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. पोभूर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील शेतकरी विनोद भाऊजी बोडेकर हा मोटरपंप काढत असताना वैनगंगा नदीचे पाणी वाढल्याने तो वाहून गेला. वरोरा तालुक्यातील राजनांदगाव ते नागरी मार्गावर ७६५ के.व्ही.चे काम सुरू आहे. अचानक पोथरा नदीला पुर आल्याने या कामावरील ११ मजूर झाडावर चढले. वरोरा पोलीस व प्रशासनाच्या वतीने तत्काळ बोट पाठवून त्यातील दहा जणांना वाचविण्यात आले. मात्र एक कर्मचारी बेपत्ता आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरात २० ते २५ घरांची पडझड झाली. चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी बस बोथली जवळच्या पुलावर रस्त्याखाली उतरली व पाण्यात गेले. चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली नाही. माजरी परिसरातील शिरणा नदीला पूर आल्याने माजरी-भद्रावती, माजरी-पळसगाव व कूचना मार्ग बंद झाले आहेत. राळेगाव येथील पूल खचल्याने वरोरा-चिमूर मार्गही बंद झाला आहे. बल्लारपूरजवळील भिवकूंड नाल्याला पूर आल्यामुळे बल्लारपूर-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे.