चंद्रपुरात दिवसा हाहाकार, रात्री कोसळधार; चंद्रपुरातील इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 01:24 PM2022-07-14T13:24:57+5:302022-07-14T13:50:53+5:30
रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून इरईचे धरणाचे सातही दरवाजे सव्वा मीटरने उघडल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील काही भागात शिरले. परिणामी नागरिकांना घर सोडावे लागले. नदीचे पाणी वाढत असल्याने पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-कोलगाव येथे वर्धा नदीच्या घाटावर पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या कामावर असलेले सहा मजूर पुरात अडकल्याची माहिती मिळाली आहे. अप्पर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्ट्यातील शेकडो घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
चंद्रपूर शहरातील काही काॅलनीमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने रहमतनगर, सिस्टर काॅलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रहमत नगर परिसरात सकाळपासून पाणी शिरत होते. त्यामुळे नदीकाठच्या अनेक कुटुंबीयांना प्रशासनाने हलविले असून सुरक्षितस्थळी पोहोचविले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : प्रशासन
कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरू नका.
येथे करा संपर्क
घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या ०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.
हे मार्ग बंद
राजुरा- बल्लारपूर,
कोरपना-आदिलाबाद
सास्ती-बल्लारपूर
चंद्रपूर-गडचांदूर
जिवती-गडचांदूर
कोरपना-कोडशी
कन्हाळगाव-चन्नई
पारडी-रुपापेठ
शेला-हेटी
कोरपना-हातलोणी
दुर्घाडी-मांगलहिरा
शेरजपिपरी- परसोडा
कुकुडबोरी-हातलोणी
कोडशी-पिपरी