मुसळधार पावसाने आक्सापूर येथील दोन तलावांची पाळ फुटली, पेरणी केलेली पिके वाहून गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:24 PM2023-07-21T12:24:36+5:302023-07-21T12:25:06+5:30
शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
आक्सापूर (चंद्रपूर) : सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आक्सापूर येथील मामा तलाव व रान तलाव अशा दोन्ही तलावांची मधोमध पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
गोंडपिपरीं तालुक्यातील आक्सापूर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने मामा तलाव व रान तलाव या दोन्ही तलावाची पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या धान रोवणी सुरू असल्याने दिवसभर शेतकरी शेतातून घरी आले होते, आणि ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाण्याच्या प्रवाहाने शेतातील रोवणी केलेले धान व पऱ्हे वाहून गेले. सदर घटनेची माहिती कळताच कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास गायकवाड, सिंचन विभागाचे अधिकारी प्रियंका रायपुरे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहटे, तहसीलदार शुभम बहाकर, देवराव भोंगळे यांनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पाहणी केली.
करंजी येथे घरात शिरले पाणी
आक्सापूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या करंजी येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरात पाणी घुसले व घरातील साहित्य पूर्णपणे भिजले. काही घरांची पडझड झाली. करंजीवासीयांना रात्र जागत काढावी लागली. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे यांनी केली आहे.