चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक गावांना पुराचा वेढा, घरांची पडझड, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 02:12 PM2022-07-14T14:12:28+5:302022-07-14T14:14:20+5:30
नदीचे पाणी वाढत असल्याने पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून इरईचे धरणाचे सातही दरवाजे सव्वा मीटरने उघडल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील काही भागात शिरले. परिणामी नागरिकांना घर सोडावे लागले. नदीचे पाणी वाढत असल्याने पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वीजपुरवठा खंडित
चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सिस्टर काॅलनी परिसरामध्ये इरई नदीचे पाणी शिरत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाणी चढत असल्याने नागरिकांनी घरातील साहित्य पॅकिंग करून घर सोडणेही सुरू केले.
सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी
इरई नदी फुगली असून नदीचे पाणी अनेक काॅलनीमध्ये शिरत आहे. दरम्यान, इरई नदीच्या चंद्रपूर-दाताळा पुलावर नागरिकांनी बरीच गर्दी केली होती. अनेक जण मोठ्या प्रमाणात सेल्फी काढत असल्याने या पुलावर जत्रेचे स्वरुप आले होते.
या गावांना पुराचा वेढा
चंद्रपूर शहरातील सिस्टर काॅलनी, रहमतनगरसह बल्लारपूर तालुक्यातील चारगाव, हडस्ती, राजुरा तालुक्यातील कोलगाव तसेच सास्ती या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.
चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद; वैनगंगा नदीला पूर
वैनगंगा नदीला पूर आल्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आष्टी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक धरणांचे पाणी सोडल्याने गुरुवारी सकाळपासूनच चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद असून वाहतूक ठप्प झाली आहे. गोंडपिपरी तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पोंभूर्णा तालुक्यात ५२ घरांची पडझड
पोंभूर्णा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाने कहर केला असून ५२ घराची अंशतः पडझड झाली आहे. मात्र सध्यातरी तालुक्यात पूर परिस्थिती नसली तरी तालुका प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे.
चार दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. यात अंशतः ५२ घरांची पडझड झाली. यात एका गोठ्याचा समावेश आहे. पोंभूर्णा तालुक्यात १ जूनपासून बुधवारपर्यंत ३६१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातून अंधारी व वैनगंगा नदी वाहते. नदीचे पात्र थडी भरून वाहत असले तरी सध्या तरी तालुक्यात पूर परिस्थिती नाही. बुधवारला दुपारी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे.
भद्रावती तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला
सतत होणाऱ्या पावसामुळे भद्रावती तालुक्यातील नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे १४ गावांचा संपर्क तुटला आहे, तर बेलगाव येथील मोटारसायकलने जाणारे दोघे वाहत असताना नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना वाचविण्यात आले आहे. मात्र त्यांची नावे कळू शकली नाहीत. तालुक्यातील कोंढा-चाल बर्डी-माजरी, कुसना-देउर वाडा-पळसगाव-नंदोरी, बेलगाव-सागरा, आगरा-चंदनखेडा, गुडगाव-वडेगाव, पारोधी या एकूण १४ गावांचा एकमेकाशी संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
येथे करा संपर्क
घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या ०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.