वादळी पावसाने अनेक गावांना झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चिमूर, बल्लारपूर आदी तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह ...

Heavy rains lashed many villages | वादळी पावसाने अनेक गावांना झोडपले

वादळी पावसाने अनेक गावांना झोडपले

Next
ठळक मुद्देभिसीत राईसमिलची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमीअनेक झाडे उन्मळून पडली, रस्त्यावरील वाहतूक ठप्पठिकठिकाणी तारा तुटून वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चिमूर, बल्लारपूर आदी तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपले. अनेक गावातील झाडे उन्मळून पडली. अनेकांच्या घरावरील टिना उडाल्या. विद्युत प्रवाहित तारा तुटून बहुतांश गावातील वीज पुरवठा खंडित झाला. भिसी येथे राईसमिलची भिंत दुकानावर कोसळून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्याने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले होते. पारा ४५ अंशापर्यंत गेला होता. अशातच बुधवारी सायंकाळी ४ वाजतानंतर वातावरणात अचानक बदल झाला. जिल्ह्यातील राजुरा, चिमूर, बल्लारपूर व कोरपना तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अचानक पावसाला सुरूवात झाली. अनेक घरांचे छपरे उडाली. झाडे पडली. विद्युत तारा तुटल्या. यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला. निजामगोंदी येथील शेतकरी महादू चायकाटे यांच्या बैलावरही वीज कोसळल्याने बैल ठार झाला. येनबोडी परिसरातील पळसगाव येथे वादळी पावसामुळे अनेक घराचे छत व टिनपत्रे उडून गेले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे गारपीट झाली. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडितच होता. दरम्यान, राजुरा- बल्लारपूर मार्गावर बाभळीचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

राजुऱ्यातील वीज पुरवठा खंडित
राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात वादळी वाºयासह सुमारे अर्धा तास पाऊस पडला. राजुरा येथील रेल्वे उडानपुलाजवळ बाभळीचे मोठे झाड पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जुना व नविन बसस्थानकावर विजेच्या तारा पडल्या. त्यामुळे राजुरा येथील वीज पुरवठाही बराच वेळ खंडित राहिला.

भिंत कोसळून एकाचा मृत्यू
भिसी : भिसी येथील दयाल राईसमिलची दहा फुटाहून अधिक उंच असलेली भिंत दुकानांवर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शाकीर पठाण असे मृतकाचे नाव असून तो टाटा सुमोचा चालक व मालक होता. प्रकाश मेश्राम असे जखमीचे नाव असून ते किराणा दुकानदार आहेत. त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. राईसमीलच्या या भिंतीला लागून चार दुकाने होती. सर्व दुकाने उद्ध्वस्त झाली. याशिवाय आदर्श जनता विद्यालय व महात्मा गांधी विद्यालयातील वर्गखोल्यांची छपरेही उडाली.

७० गावे राहणार अंधारात
वनसडीजवळ मोठमोठी वृक्षे कोसळली. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी असे वृक्ष कोसळल्याचे दिसून आले. वादळामुळे वनसडीतील केळीच्या बागेचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, जिनिंगमधील मजुरांचे निवास कोसळले. कोरपना, इंजापूर, सोनुर्ली, नारंडा, वनसडी येथे विद्युत खांब कोसळले. विजेच्या तारा तुटल्याने कोरपना तालुक्यातील ७० गावे बुधवारी रात्री राहणार अंधारात राहणार आहेत.

कोरपना तालुक्यात घरांचे छपरे उडाली
कोरपनातील माऊली मंदिर, राजीव गांधी चौक परिसरातील विद्युत खांबावर एका घरावरून उडालेली टीन अडकून पडली. टेलीफोन एक्सचेंज कार्यालयामधील मोठे वृक्ष कोसळले. सोबतच दोन विद्युत खांबही कोसळले. राजीव गांधी चौकातील काही पानठेल्याची टिन पत्रे उडाली. याशिवाय कोरपना शहरातील अनेक घरांवरील छते उडाली. विद्युत खांब व वृक्ष विद्युत तारांवर कोसळल्याने कोरपना तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.

Web Title: Heavy rains lashed many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस