गोवरीवासीयांनी रोखली वेकोलिची जड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:24+5:302021-09-21T04:31:24+5:30
राजुरा -गोवरी- कवठाळा या मुख्य मार्गावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन ...
राजुरा -गोवरी- कवठाळा या मुख्य मार्गावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात सरपंच आशा उरकुडे, युवा तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, हेमंत बावणे, रामदास जीवतोडे, अरुण पाचभाई, सूरज जीवतोडे, सुरेंद्र डाहुले व गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्काजाम आंदोलनात वेकोलिच्या पोवनी २ व गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे व ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू आहे. धुळीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. गोवरी, पोवनी, साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ताडपत्री न झाकता वाहतूक सुरू असल्यामुळे धावत्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडतात. त्यामुळे नागरिकांना पुन्हा चक्काजाम आंदोलन करावे लागले.
आंदोलनानंतरही वेकोलिचे अधिकारी गप्पच
वेकोलितून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक जीवघेणी आहे. अनेकदा ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याचे लेखी आश्वासन वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले; परंतु गावकऱ्यांच्या जिवाशी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नाही. आंदोलनानंतरही वेकोलिचे अधिकारी गप्पच आहेत. त्यामुळे वेकोलिच्या मुजोर प्रशासनावर अंकुश कोण ठेवणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
200921\img-20210920-wa0021.jpg
गोवरी वासियांनी केले रास्तारोको आंदोलन