मृतकांच्या वारसांनी सरकारी विम्याचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:35 AM2021-04-30T04:35:46+5:302021-04-30T04:35:46+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर ...
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असते. कोरोना काळात अनेक आकस्मिक मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे. त्या कुटुंबाची आर्थिक, मानसिक हानी होत आहे, जी कधीही भरून निघणारी नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झालेला आहे. अशावेळी कुठल्याही सरकारी बँकांमध्ये खाते काढून शासकीय योजनेनुसार बचत केलेले असल्यास आणि त्यांच्या खात्यामधून दर वर्षाला १२ रुपये विमा कपात केला जातो. हा दोन लाखांपर्यंत विमा असतो. तसेच प्रति वर्षाला ३३० रुपयांचा विमा असल्यास त्यालासुद्धा नैसर्गिक मृत्यू करिता जवळपास दोन लाखांचा विमा मिळतो. खातेधारकांनी विमा काढलेला असेल तरी बहुतांश कुटुंबातील इतर व्यक्तीला याची माहिती नसते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कोरोना या किंवा इतर कारणामुळे निधन झाले असेल व तो व्यक्ती बँक खातेधारक असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीने संबंधित बँकमध्ये जाऊन विमा आहे की नाही या बाबीची चौकशी करावी आणि विमा असल्यास आवश्यक कागदपत्रासह विम्याची केस तयार करून विमा मिळवावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अश्विन मेश्राम यांनी केले आहे.