राजुरा-गोवरी-कवठाळा रस्त्यामुळे नागरिकांना नरक यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:25 AM2021-03-22T04:25:05+5:302021-03-22T04:25:05+5:30
वर्षभरापासून दुरुस्ती व बांधकाम सुरूच : अनेक ठिकाणी खोदले खड्डे नितीन मुसळे सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणारा ...
वर्षभरापासून दुरुस्ती व बांधकाम सुरूच : अनेक ठिकाणी खोदले खड्डे
नितीन मुसळे
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणारा राजुरा-माथरा-गोवरी-पोवनी-कवठाळा हा मुख्य मार्ग असून, या रस्त्याचे नव्याने बांधकाम व दुरुस्तीचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. बांधकामामुळे रस्त्यावरील धोकादायक स्थिती, ठिकठिकाणच्या खोदकामामुळे आणि रस्त्यावरील धुळीमुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे. राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलीच्या खाणी आहेत. या खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा-माथरा-गोवरी-पोवनी-कवठाळा मार्गाने मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतुक सुरू असते. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून नेहमीच रस्त्यांची दैनावस्था असते. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर माथरा, गोयेगांव, चिंचोली, गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, नांदगांव, जौतापूर अशा विविध गावातील नागरिक ये-जा करीत असून, या सर्व गावांतील नागरिकांना या रस्त्याचा नेहमीच त्रास होत असतो. वेकोली परिसरातून जाणाऱ्या या रस्त्याची नेहमीच थातुरमातुर दुरुस्ती केली जाते, परंतु रस्ता पूर्णपणे कधीच चांगला नसतो. राजुरा-माथरा-गोवरी-पोवनी-कवठाळा या मार्गावरून या परिसरात असलेल्या कढोली (बु) येथील वर्धा नदीवर मोठा पूल बांधल्यामुळे या मार्गावरून चंद्रपूरला जाणे सोपे झाले.
बॉक्स
२४३ कोटींची तरतूद
राज्य मार्गाचे विभाजन होऊन महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा महामार्ग, तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून तत्कालीन आमदार ॲड.संजय धोटे यांच्या कार्यकाळात या रस्त्याच्या सुधारणेकरिता २४३ कोटी रुपये मंजूर झाले व कामही सुरू करण्यात आले, परंतु वर्षभराहून अधिक कालावधी लोटला असूनही रस्त्याची दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्त्याची दैनावस्था झालेली आहे.
बॉक्स
परिसरात धुळीचे साम्राज्य
काम सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी खोदकाम केल्या गेले आहे. अनेक ठिकाणी वळण मार्ग तयार करण्यात आले, परंतु हे वळण मार्ग शेतातून काढल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असते. या धुळीमुळे आणि रस्त्याच्या कामातील खोदकामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून, बांधकामच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षिततेचे फलकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना दुचाकीच नाही, तर चारचाकी वाहनधारकांनाही नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
कोट
या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन आमदार ॲड.संजय धोटे यांच्या पुढाकाराने मोठा निधी मंजूर करण्यात आला व कामही सुरू करण्यात आले, परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याकरिता अनेकदा निवेदने देण्यात आली असून, आता मात्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल.
- सुनील उरकुडे, जि.प.सभापती