हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:31+5:302021-09-19T04:28:31+5:30

दीपक साबने जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात ...

Hello Chanda Grievance Redressal Mechanism Not Reachable | हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

googlenewsNext

दीपक साबने

जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध जातात. मात्र, त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, सध्या ही यंत्रणादेखील नॉट रिचेबल झाली आहे.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध संघटनेच्या माध्यमातून तक्रार करूनही आरोग्य, शिक्षण, दळणवळण, विद्युत पुरवठा, शेती कर्ज अशा नानाविध समस्यांनी जिवती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था जिवती तालुक्याची झाली आहे. विविध समस्यांकडे शासनाचा कानाडोळा आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

मागील पंचवार्षिकमध्ये हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा ही जिल्ह्यातील कुठल्याही समस्येचे तक्रार निवारण करण्यासाठी उदयास आली होती. सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्य करीत होती. आपल्या समस्या सामान्य जनतेला मांडण्यासाठी १८००- २६६-४४०१ टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध होती. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून अनेक समस्यांचे निवारणदेखील करण्यात आले. मात्र, आजघडीला जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासला आहे. समस्येविषयी तक्रारी करूनदेखील त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून बघितला असता सध्या हॅलो चांदा नॉट रिचेबल अवस्थेत आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठीची यंत्रणाच आता वेगळी समस्या झाली आहे.

बॉक्स

यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज

हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईल काय किंवा त्याच धर्तीवर दुसरी यंत्रणा सुरू होईल काय, नागरिकांच्या समस्या सुटतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक समस्या घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्य नाही. त्यामुुळे हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: Hello Chanda Grievance Redressal Mechanism Not Reachable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.