चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:13 AM2017-10-04T00:13:44+5:302017-10-04T00:13:56+5:30
शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी,.....
चंद्रपूर: शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी, चोर खिडकी, हनुमान खिडकी, विठोबा खिडकी, जटपुरा गेट परिसराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले आदी उपस्थित होते. चंद्रपूर शहराच्या गोंडकालीन ऐतिहासिक कोहिनूर पटांगण तथा किल्ल्याचे परकोट्याची स्वच्छता चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर व इको-प्रो संस्थेच्या सहकार्याने करण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृतीच्या एक सुंदर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी हंसराज अहीर यांनी या अभियानाकरिता महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे, लोकमान्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन केले. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहू शकते, याकडेही लक्ष वेधले. शहराच्या विकासासाठी अनेक योजना सुरू आहेत. यातून शहरचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आयुक्त संजय काकडे यांनी शहरातील विविध विकासकामांची माहिती दिली.
महानगर पालिकेने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती करण्याचे आवाहन उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहूल पावडे तसेच वॉर्डातील अन्य मान्यवर उपस्थित होते.