बोनम्यारोग्रस्त निशाच्या मदतीसाठी लग्न समारंभात लावला मदत स्टॉल
By admin | Published: June 22, 2017 12:39 AM2017-06-22T00:39:12+5:302017-06-22T00:39:12+5:30
येथील निशा मैती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाखांचा खर्च येणार आहे.
वरोरा येथील उपक्रम : गोंडे परिवाराचा समाजापुढे नवा आदर्श
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : येथील निशा मैती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाखांचा खर्च येणार आहे. मात्र आर्थिक परिस्थतीमुळे तिच्या कुटुंबीयांना एवढी रक्कम शक्य नसल्याने सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून रक्कम उभारली जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वरोरा येथील गोंडे परिवाराच्या लग्न समारंभात मदत स्टॉल लावून मदत गोळा करण्यात आली. यातून गोंडे परिवाराने समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे.
विवाह संस्कार हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. आजच्या स्पर्धामय युगात या समारंभात लाखो रुपये खर्ची घालताना कोणताही विचार केला जात नाही. १९ जून रोजी वरोरा येथील नारायणराव गोंडे याची कन्या सुप्रिया हिचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नसमारंभात येणारे सर्व आप्तेष्ट तथा मित्र परिवाराला त्यांनी आवाहन केले की, माझ्या कन्येच्या लग्नात येवून आपण भेटवस्तू दिली आहे. पण आमच्या वरोरा शहरातील हनुमान वॉर्ड येथील माहेर असणाऱ्या निशा मैती या लेकीला बोनम्यारो हा दुर्धर आजार जडला आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाख रुपये खर्च येणार आहे. तिला उपचाराकरिता एक हाथ मदतीचा आयोजन समिती व छावा ग्रुप शहरामध्ये मदत मागत आहे. आपण माझ्या मुलीला भेटवस्तू दिली त्याचप्रमाणे निशा मैती या वरोऱ्याच्या लेकीलाही उपचाराकरिता मदत करा असे आवाहन केले होते.
त्यामुळे लग्न समारंभात आलेल्या आप्तेष्ठ व मित्र परिवाराने जमेल तेवढी मदत केली. हा उपक्रम तेवढ्यावरच न थांबता वडिलाची निशाबद्दल असणारी संवेदना लक्षात घेत नववधू सुप्रिया हिने पतीला विश्वासात घेऊन ओवाळणीला आलेले पैसे निशाच्या उपचाराकरिता दिले. त्यामुळे गोंडे कुटुंबीयाचे सर्वत्र कौतुक होत असून इतरांनीही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्याकडून
मिळणार मदत
निशाच्या उपचाराकरिता मदतीचे आवाहन करण्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. ‘लोकमत’ने यावर वारंवार पाठपुरावा करून बातम्या प्रकाशित केल्या. बातमीची कात्रणे सोशल मिडीयावर पसरली. यानंतर याची दखल इतर माध्यमांनी घेतली. यावरून मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निशाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.