गोलेच्छा ट्रान्सपोर्टमधील मशीनमध्ये दबून मदतनीसचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:15+5:302021-02-06T04:52:15+5:30
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या पैनगंगा खाणीमध्ये ओबो हटविणाऱ्या तथा कोळसा उत्खनन करण्याचे काम करणाऱ्या गोलेच्छा ट्रान्सपोर्टमधील एक ...
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या पैनगंगा खाणीमध्ये ओबो हटविणाऱ्या तथा कोळसा उत्खनन करण्याचे काम करणाऱ्या गोलेच्छा ट्रान्सपोर्टमधील एक कर्मचाऱ्याचा पे लोडर मशीनखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
सचिन करमनकर (वय २८, रा.गाडेगाव (विरूर) असे मृतकाचे नाव आहे. वेकोली वणी क्षेत्राच्या पैनगंगा खदानीत गोलेच्छा ट्रान्सपोर्ट कंपनीत एका पे लोडर मशीनचा मागील हेड लाइट बंद असल्यामुळे त्याचे काम सुरू होते, तर दुसऱ्या पे लाेडर मशीनचा ऑपरेटर हॅन्ड ब्रेक लावून चहा पिण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा सचिन करमनकरहा पे लाेडर मशीनच्या मागे उभा असताना पे लाेडर मशीनचा हॅन्ड ब्रेक निघून सचिनच्या अंगावर मशीन आली व त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री २ वाजतादरम्यान घडल्याचे सांगितले जाते. याची माहिती गोलेच्छा कंपनीच्या व्यवस्थापनाला होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वेकोली वणी क्षेत्रातील घुग्घुसच्या राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गडचांदूर पोलीस तपास करीत आहे. घटनेमुळे गावात संताप व्यक्त होत आहे.