कोरोनाग्रस्तांसाठी चंद्रपुरातील डॉक्टरांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:35 AM2021-04-30T04:35:57+5:302021-04-30T04:35:57+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड रुग्णालय फुल्ल झाले आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्येसुद्धा जागा अपुरी ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड रुग्णालय फुल्ल झाले आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्येसुद्धा जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या व घरी विलगीकरणाची सोय असणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी खासगी डॉक्टरकडून अर्ज भरुन घ्यावा लागतो; मात्र काही डॉक्टर हा अर्ज भरुन देण्यासाठी पाच हजारावर रुपये घेतात; परंतु चंद्रपुरातील डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे या दाम्पत्याने अशा रुग्णांना मोफत अर्ज भरुन देणे, तसेच मोफत उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्यापासून प्रेरित होत चंद्रपुरातील पुन्हा दहा डॉक्टरांनी गरजूंना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये डॉ. अनुप पालीवाल, डॉ. ज्योत्स्ना उमरेडकर, डॉ. प्रियदर्शन मुठाड, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. सोनाली कपूर, डॉ. राजू ताटेवार, डॉ. सुनील भलोजवार, डॉ. प्रकाश रामटेके, डॉ. संदीप शेंडे, डॉ. राहुल साळवे यांनी गरजूंवर मोफत सेवा व इतरांवर माफक दरात सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयाने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बॉक्स
डॉ. गावतुरे दाम्पत्यापासून प्रेरणा
चंद्रपूर येथील डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे या दाम्पत्याने चंद्रपुरात कोरोना रुग्णांना विलगीकरण अर्ज भरुन देण्यापासून ते रुग्णांवर उपचार, समुपदेशन करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक रुग्णांकडे ऑक्सिमीटर नसल्याने त्यांना ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यास अडचण जात असल्याचे लक्षात आले. त्यांनी ठराविक कालावधीसाठी मोफत ऑक्सिमीटर वाटप करण्यास सुरुवात केली. त्याच्याच उपक्रमापासून शहरातील बहुतांश डॉक्टरांनी प्रेरणा घेत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यास सरसावले आहेत.