म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:34 AM2023-07-21T10:34:25+5:302023-07-21T10:39:36+5:30

गंभीर जखमी होऊन वाघ दगावला

herd of buffaloes fought back and killed a tiger, thrilling incident in Chandrapur district | म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना

म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना

googlenewsNext

राजू गेडाम

मूल (चंद्रपूर) : फडशा पाडायला आलेल्या वाघाला तीन म्हशींनी झुंज देत जखमी केल्याचा थरार मूल तालुक्यातील बेंबाळ शिवारात गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. म्हशींनी एकीच्या बळावर जंगलाच्या राजाला दिलेली थरारक झुंज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. जखमी वाघाची सहा तासातच मृत्यूशी झुंज संपली.

वाघ जखमी झाल्याची वार्ता परिसरात पसरताच लोकांची तोबा गर्दी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाचे पथक दाखल झाले. वनविभागाने जखमी वाघावर उपचार करण्यापूर्वीच सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

मूल तालुक्यातील येसगाव येथील गणेश भाऊजी सोनुले (३५) हा गुराखी मनोरुग्ण असल्याने रात्री-बेरात्री फिरत असतो. गुरुवारी पहाटे ४ वाजता तो हातात कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला. भजाळी गावाजवळ वाघाने गणेशवर हल्ला केला. गणेशने तत्परता दाखवत हातातील कुऱ्हाड उगारताच वाघाने पोबारा केला. वाघाच्या हल्ल्यात गणेश जखमी झाला. दरम्यान, हाच वाघ फिरत बेंबाळ शेतशिवारात आला. जवळच म्हशींचा कळप चरत होता. वाघाने एका म्हशीवर हल्ला करताच कळपातील तीन म्हशी त्याच्यावर तुटून पडल्या. म्हशींच्या एकजुटीमुळे वाघाचा टिकाव लागला नाही. हार पत्करत वाघ जखमी अवस्थेत एका बाजूला निपचित पडला.

पकडण्यापूर्वीच वाघाचा मृत्यू

म्हशींसोबत झुंज देताना वाघ गंभीर जखमी झाला. या वाघावर उपचार करणे आवश्यक असल्याने याची माहिती स्थानिक वनरक्षकांनी वरिष्ठांना दिली. यावेळी एससीएफ श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी गाडेवार, क्षेत्र सहायक अजय बोधे, वनरक्षक कस्तुरे, वनरक्षक प्रमोद दुधबुळे, वनरक्षक मेश्राम व वन कर्मचारी उपस्थित होते. वाघाला पकडण्यासाठी पिंजराही लावलेला होता. मात्र, पकडण्यापूर्वीच वाघाचा मृत्यू झाला.

मेंढपाळाच्या डेऱ्यावर वाघाचा हल्ला; तिघे जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी शेतशिवारात नांदगाव येथील मेंढपाळाचे कुटुंब मेंढ्यांच्या कळपासह डेरा टाकून झोपलेले असताना वाघाने अचानक हल्ला केला. तथापि मेंढपाळ कुटुंबाने मोठ्या धैर्याने वाघाचा हल्ला परतवून लावला. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.

वाघाच्या हल्ल्यात सुरेश पोचू दुर्कीवार (वय ५५), वेणूबाई सुरेश दुर्कीवार (वय ५०) व मुलगा पंकज (वय १९) हे गंभीर जखमी झाले. यादरम्यान अनेक मेंढ्या सैरभैर धावत सुटल्या. यातील अनेक मेंढ्या गायब आहेत. नांदगाव येथील मेंढपाळ सुरेश पोचू दुर्कीवार हे आपल्या कुटुंबीयासह घोसरी लालहेटी शिवारात मेंढ्यांच्या कळपाचा डेरा टाकून मुक्कामाला आहेत. त्यांच्याकडे २०० मेंढ्या आहेत. मेंढ्याच्या ओरडण्याने कुटुंबीय जागे झाले. या कुटुंबाने घाबरून न जाता मोठ्या धैर्याने वाघाला परतावून लावले. यादरम्यान सुरेशच्या डोक्याला, पत्नी वेणूबाई हिच्या हाताला, पाठीला गंभीर इजा झाली. मुलगा पंकजही जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक अजय बोधे, वनरक्षक प्रमोद दुधबळे, वनरक्षक सूरज मेश्राम व पथकाने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लगेच उपचारार्थ पोंभूर्णा रुग्णालयात हलवले. तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Web Title: herd of buffaloes fought back and killed a tiger, thrilling incident in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.