कोळसा खाणींमुळे चंद्रपूरने गाठला तापमानाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:10 AM2019-05-19T00:10:49+5:302019-05-19T00:11:34+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. कोळसा खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याने तापमानाचा उच्चांक गाठल्याने उन्हाळ्यात जनजीवन प्रभावित होत आहे.
चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर परिचित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसाचे जाळे असल्याने वेकोलिने जिल्ह्याच्या बहुतांश भागात खुल्या व भूमिगत कोळसा खाणी निर्माण केल्या. चंद्रपूर व राजुरा तालुका तर वेकोलिच्या कोळसा खाणींसाठी अग्रेसर मानला जातो. दुर्गापूर, रयतवारी, पद्मपापूर, गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या परिसरात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कोळशामुळे येथील वातावरण नेहमीच उष्ण असते. सध्या तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सीअसच्या पार गेला आहे. नागरिकांना सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पूर्वी एवढे तापमान नव्हते. परंतु खदानीमुळे आता परिसर अधिकच उष्ण झाला आहे.
खाणींमध्ये वर्षभर उष्णता
वेकोलिच्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळशाची उष्णता असते. वर्षभर येथील वातावरण उष्ण असते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणावरही त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतो. कोळसा खाणीत उन्हाळ्यात तर भीषण परिस्थिती असते. खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे या कालावधीत मोठे हाल होतात. तीव्र उष्णतेचा त्यांना सामना करावा लागतो. खाणीजवळच्या गावातही उष्णतेचा कहर असतो.
कोळसा खाणी निर्माण होण्यापूर्वी गोवरी - सास्ती परिसरातील वातावरण थंड होते. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे आता या परिसरात वर्षभर उष्णता असते. खाणींच्या दुष्परिणामांचा फटका नागरिकांना बसत आहे. - मारोती पाटील लोहे, गोवरी
चंद्रपूरच्या परिसरात कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. वीज केंद्र आहे. यामुळे वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड, मिथेन यारखे वायू पसरत असल्याने तापमानात वाढ होत आहे.
- प्रा. योगेश दुधपचारे, चंद्रपूर