उच्च विद्या विभुषीत युवती बनली गावची कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:05+5:302021-07-24T04:18:05+5:30
पाॅझिटिव्ह स्टोरी सावली : गाव विकास करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन गावाचा कारभार करावा, अशा प्रकारचे विचार ...
पाॅझिटिव्ह स्टोरी
सावली : गाव विकास करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन गावाचा कारभार करावा, अशा प्रकारचे विचार अनेक विचारवंतांनी मांडले आहेत. त्याचाच प्रत्यय सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे आला. गुरुवारी पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत एका उच्च शिक्षित युवतीने बाजी मारली आहे. यमुताई होमदेव मेश्राम असे त्या युवतीचे नाव आहे. ती प्राणिशास्त्र विषयात स्नातकोत्तर (एमएस्सी झू) परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेली आहे. अशा उच्च शिक्षित युवतीने गावाच्या कारभारात प्रत्यक्ष सहभाग घेऊन सरपंचपदापर्यंत मजल मारली आहे.
उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत किंवा इतरत्र नोकरीची संधी शोधण्यापेक्षा तिने राजकारणात येऊन गाव विकासाचा कारभार चालविण्यावर अधिक भर दिला आहे. राजकारणाचे बाळकडू तिच्या घरूनच मिळाले. तिचे वडील होमदेव मेश्राम यांनीही यापूर्वी सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे. आजही गावातील राजकारणात ते सक्रिय भूमिका घेत आहेत. याच पार्श्वभूमीतून यमुने गावकारभाराचा मार्ग स्वीकारला. काही गावांमध्ये अल्पशिक्षित कारभाऱ्यांचा भरणा स्थानिक पातळीवर अधिक असतो. मात्र यमूच्या उच्च शिक्षणाचा फायदा गावविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या युवतीची सरपंचपदी अविरोध निवड करून एक नवा आदर्श इतरांसाठी घालून दिला आहे. वाघोली बुटीकरांनी याप्रसंगी दिलेला एकतेचा परिचय अन्य गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा.
कोट
शेतकरी कुटुंबातील असून घरची परिस्थिती बेताची आहे. उच्च शिक्षण घेऊन प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाला. दरम्यान, गावची निवडणूक होती. त्यात मी सहभागी झाले. सरपंचही बनले. प्रशासकीय सेवेत जायचे आहे. परंतु कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना नाईलाज झाला. गावविकासासाठी सरपंचपदाला न्याय देऊनच कार्य करावे लागेल. तेव्हाच उच्च शिक्षणाचे सार्थक होईल.
- यमू मेश्राम, नवनियुक्त सरपंच, वाघोली बुटी
230721\img-20210723-wa0196.jpg
यमुताई मेश्राम