हिंदू-मुस्लीम एकोप्यामुळे देश समोर जाईल
By admin | Published: July 9, 2016 01:04 AM2016-07-09T01:04:36+5:302016-07-09T01:04:36+5:30
विविध समाजाचे नागरिक आपल्या देशात एकोप्याने काम करीत आहेत. यामुळेच आम्हाला काम करताना फार त्रास होत नाही.
महामुनी : पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टी
मूल : विविध समाजाचे नागरिक आपल्या देशात एकोप्याने काम करीत आहेत. यामुळेच आम्हाला काम करताना फार त्रास होत नाही. असेच हिंदु- मुस्लीम समाजाचे संबंध कायम राहिल्यास देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असे मत मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुनी यांनी व्यक्त केले. ते मूल पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत बोलत होते.
येथील पोलीस स्टेशनच्या पटांगणात घेण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्या अध्यक्षस्थानील मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून जामा मस्जिदचे मौलाना मोहम्मद शमशेर रजा, हजरत अबू बकर सिद्धीकी मदरसा मूलचे मौलाना अब्दुल रऊफ मोहम्मद इब्राहिम, जामा मस्जीदचे मौजीम मौहम्मद तफशीर रजा, हजरत अबू बकर सिद्धीकी मदरसाचे अध्यक्ष वाजीद खान, जामा मस्जीद उपाध्यक्ष बबलू कुरेशी, सचिव गुलाब खाँ पठाण, अस्लामभाई, सलीम भाई, शक्कुरभाई, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव गंगाधर कुनघाडकर, पत्रकार युवराज चावरे आदी उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी म्हणाले की, मला आपल्या समाजासोबत जास्त काम करता आले नाही. परंतु जेवढे काम केले तो अनुभवही चांगला होता. गुन्हे जरी आपल्या काही बांधवावर दाखल झाले. परंतु जमानतदार हे संपूर्ण हिंदू होते. मूल तालुक्यात हिंदू-मुस्लीम अशी कधीच तक्रार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पिसे यांनी तर आभार अमलदार कुळमेथे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
ईदचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
विरुर (स्टे.) : मुस्लिम धर्मियामध्ये पवित्र मानली जाणारी ‘रमजान ईद’ मोठ्या हर्षोल्लासात व बंधुभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासून मुस्लिम बांधवांनी ईदच्या विशेष नमाजासाठी ईदगाहरवर गर्दी केली होती. शेकडो मुस्लिम बांंधवांनी या विशेष नमाज अदा केली. गावातील इदगाह समोर विरुर पोलीस ठाणे व नवयुवक उत्सव समिती विरुर यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. विरुरचे ठाणेदार श्याम गव्हाणे, सरपंच भास्कर सिडाम, उपसरपंच गुलाब ताकसांडे, दिलीप बेहरे, सुनील राऊत, वामन राठोड, ईदल राठोड, सचिन पडवे, व्यापारी अध्यक्ष संतोष ढवस, प्रशांत पवार, रवींद्र ताकसांडे, रवींद्र चांदेकर, गजानन ढवस, अविनाश रामटेके, भूपेंद्र बोढे, शाहु नारनवरे, श्रीनिवास ईलुदूरा यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन भाईचाऱ्याचे वातावरण निर्माण केले आहे.