डॉक्टरांचे सामाजिक भान हीच त्यांची प्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:48 AM2018-04-26T00:48:50+5:302018-04-26T01:06:06+5:30
भारतीय समाजातील डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम देवाच्या तुलनेची राहिली आहे. ती अजूनही त्याच उंचीवर कायम आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिगत व सामुदायिक सहभागातून समाजाला कायम मदतच झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय समाजातील डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम देवाच्या तुलनेची राहिली आहे. ती अजूनही त्याच उंचीवर कायम आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिगत व सामुदायिक सहभागातून समाजाला कायम मदतच झाली आहे. डॉक्टरांच्या सरावाएवढेच तुमचे सामाजिक भान तुमच्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवत असते, त्यामुळे येणाऱ्या काळातही आपल्या समुदायाकडून हे सामाजिक भान अधिक मोठ्या प्रमाणात जपले जावे, असा आशावाद वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथील आयएमएच्या हॉलमध्ये आयएमएच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे, आयएमएच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, महाराष्ट्र मेडीकल कोंसिलचे संयोजक सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, आय. एम. ए महाराष्ट्र युवा समितीचे अध्यक्ष डॉ. पियुष मुत्यालवार, नागपूरचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एका डॉक्टर परिवारातील सदस्य असल्यामुळे डॉक्टरांच्या सामाजिक दायित्वाची मला कायम जाणीव आहे. समाजातील अन्य व्यवसायाप्रमाणे डॉक्टरांमध्ये देखील काही उपद्रवी मूल्यांमुळे डॉक्टरांच्या व्यवसायाची प्रतिमा मलिन झाल्याबाबत याठिकाणी बोलले गेले. मात्र ही वस्तुस्थिती नाही. समाजामध्ये आजही डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. प्रमोद राऊत, डॉ. विजय करमरकर, डॉ. मन्सूर चिनी, डॉ. मनीष मुंधडा यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारिणी कार्यरत झाली आहे. यामध्ये महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शर्मिली पोद्दार सहअध्यक्ष मनीषा वासाडे यांची निवड करण्यात आली.