आयुष्याच्या सायंकाळी त्यांची अशीही समाजसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:12+5:302021-09-13T04:26:12+5:30
गोवरी : समाजात अशीही काही सेवाभावी माणसे आहेत की जी आजही सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेत असतात. ...
गोवरी : समाजात अशीही काही सेवाभावी माणसे आहेत की जी आजही सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेत असतात. आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून ते रस्त्याची साफसफाई करीत आहेत. राजुरा तालुक्यातील चिंचोली (खु.) येथील चंपतराव कावडकर (६५) असे या स्वच्छतादूताचे नाव असून, त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आपण समाजाचे काही देणे लागतो, समाजासाठी काहीतरी आपणही केले पाहिजे, या एकाच ध्यासापाई ते आजही गावातील रस्त्यावर टाकलेला कचरा उचलून त्याठिकाणी असलेला परिसर स्वच्छ करतात. चिंचोली ते गोवरी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा वाढला होता. रस्ता रुंद असूनही दोन्ही बाजूने गवत व काटेरी बाभळीचे अतिक्रमण झाल्याने रस्ता पूर्णतः अरुंद झाला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. आपल्याला मिळालेल्या वेळातून काही वेळ समाजासाठी द्यावा या उदात्त हेतूने श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक चंपतराव कावडकर यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडेझुडपे तोडून रस्ता पूर्णतः स्वच्छ केला. त्यामुळे हा गावात जाणारा वळण रस्ता पूर्णतः मोकळा झाल्याने समाधानाचे भाव चंपतराव कावडकर यांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते वेळ मिळेल तेव्हा सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होऊन समाजात चांगले विचार पेरण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात.
120921\img_20210910_140403.jpg
स्वच्छतादूताने साफ केला झुडपांचा रस्ता